परळी ( बीड) : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी पंकजा मुंडे यांची आज बिनविरोध निवड झाली. तर व्हाईस चेअरमन म्हणून चंद्रकांत कराड यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
वैद्यनाथ साखर कारखाना निवडणुकीत सर्व २१ संचालकांची १ जून रोजी बिनविरोध निवड झाली. यावेळी भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे आमदार माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी ११- १० संचालक बिनविरोध निवडीचा फार्मूला वापरला. विशेष म्हणजे, या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. कारखाना आर्थिक संकटात असल्याने पंकजा मुंडे व धनंजय मुंडे या बहीण- भावांनी एकत्रित येऊन कारखाना निवडणूक बिनविरोध केली. दरम्यान, आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी जिल्हा उपनिबंधक जाधव यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. तर व्हाईस चेअरमन म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चंद्रकांत कराड यांची निवड झाली.
या बैठकीस संचालक सर्वश्री सतीश मुंडे, शिवाजीराव गुट्टे, श्रीहरी मुंडे, अजय मुंडे, वाल्मिक कराड, रेशीम नाना कावळे, ज्ञानोबा भगवान मुंडे, राजेश गिते, पांडूरंग फड, हरिभाऊ गुट्टे, सचिन दरक, सुरेश माने, वसंत राठोड, शिवाजीराव मोरे, सुधाकर सिनगारे, सत्यभामा उत्तमराव आघाव, मंचक घोबाळे, केशव माळी आदी उपस्थित होते.
पंकजा मुंडेंसह संचालक गोपीनाथ गडावरपंकजा मुंडे यांची चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी स्वागत करून अभिनंदन केले. त्यानंतर पंकजा मुंडे, चंद्रकांत कराड यांच्यासह सर्व संचालकांनी गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.