बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखविले. हा प्रकार बीड तालुक्यातील साक्षाळपिंपरी येथे शनिवारी सकाळी घडला. याप्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात पाच आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
बीड लोकसभा निवडणूकीची उमेदवारी जाहिर झाल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे शुक्रवारी जिल्ह्यात आल्या. शनिवारी सकाळी त्या नारायणगाडवर दर्शनासाठी गेल्या. परत बीडला येताना साक्षाळपिंपरी येथील मराठा आंदोलकानी त्यांच्या गाडीला काळे झेंडे दाखविले. पोलिसांनी त्यांना बाजूला केले. परंतू यावेळी एक मराठा, लाख मराठा अशा घोषणाही आंदोलकांनी दिल्या.
आंदोलक आक्रमक झालेले पाहून त्यांचा ताफा सरळ बीडला निघून आला. त्यानंतर पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघण, आचारसंहिता असतानाही विनापरवानगी आंदोलन केल्याने पोलिसांच्या फिर्यादीवरून भरत बबन काशीद, शशिकांत परसराम काशीद, श्रीराम बंडू काशीद, अक्षय अजिनाथ काशीद, ज्ञानेश्वर हौसराव काशीद यांच्यासह अनोळखी ८ ते १० मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. या सर्वांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी सांगितले.