परळी: भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 'मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Narendra Modi) हरवू शकत नाहीत,' असे वक्तव्य पंकजा मुंडेंनी केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर आता स्वतः पंकजा यांनी खुलासा केला आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना पंकजा म्हणतात की, मोदीजींचा उल्लेख हा सकारात्मक अंगाने केला होता. यात मोदीजींबद्दल कुठलेही नकारात्मक उल्लेख केला नाही. मी भाषणातून येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचलित जात, पात, पैसा या मार्गांऐवजी जनतेच्या हृदयात स्थान मिळवण्याकरीता नविन पद्धतीचे राजकारण करण्याचे आवाहन केले होते. या संदर्भाने मोदीजींचा उल्लेख केला होता, असे पंकजा म्हणाल्या.
पंकजा मुंडेंचे ट्विट:-
पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर त्यांच्या भाषणाच्या व्हिडिओची लिंक शेअर केली आहे. या लिंकसोबत कॅप्शनमध्ये पंकजा मुंडे लिहितात, 'मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरपासून विविध कार्यक्रम केले, त्यात बुद्धिजीवी संमेलनमधील माझ्या भाषणाची एक ओळ आपल्यापर्यंत आलीच आहे. "सनसनीखेज" बातम्यातून जमले तर हेही पहा. मतितार्थ लक्षात येईल. पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या लिंकवर आहेच. धन्यवाद.'
काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वढदिवसानिमित्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीडच्या अंबाजोगाई येथे करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, काँग्रेस पक्षात वंशवादाचे राजकारण सुरू आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणीही संपवू शकतं नाही. मी जर लोकांच्या मनामध्ये राज्य केलं तर नरेंद्र मोदी देखील मला संपवू शकणार नाही, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. पंकजा मुंडेंच्या याच भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.