बीड : माजी मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली असून त्यांनी स्वत:ला आयसोलेट करण्याचा निर्णय घेतला आहे. पंकजा या सध्या मुंबईत असल्याचे समजते.
आज पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मतदान सुरु आहे. त्याच्या आदल्या दिवशीच रात्री पंकजा यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ''मला सर्दी, खोकला, ताप आहे. यामुळे मी जबाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे'', असे आवाहन पंकजा यांनी केले आहे.
पंकजांनी चार दिवसांपूर्वीच केली होती ठाकरे सरकारवर टीकाराज्यातल्या ठाकरे सरकारला वर्ष पूर्ण झाले. यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंनी सरकारला शुभेच्छा दिल्या होत्या. राज्यात गेल्या वर्षी आगळंवेगळं सरकार सत्तेवर आलं. सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. त्यामुळे त्यांच्यात वारंवार गोंधळ पाहायला मिळतो, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी त्यांनी कोरोना संकट, अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान, मराठा आणि धनगर आरक्षणावर भाष्य करत सरकारचा समाचार घेतला.
'सत्तेत असलेल्या तिन्ही पक्षांच्या विचारधारा वेगळ्या आहेत. त्यांना मतदारांकडून जनादेश नव्हता. मात्र तरीही त्यांनी सरकार स्थापन केलं. त्यामुळे सरकार टिकवणं याच गोष्टीला त्यांनी प्राधान्य दिलं. जनहित त्यांच्यासाठी प्राधान्याचा विषय नव्हता,' अशी टीका केली. अंगावर येणाऱ्यांच्या मागे हात धुवून लागण्याचा इशारा देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. 'लढाई मुद्द्यांची असावी, वैयक्तिक नसावी. त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपावी. आम्हीदेखील जपू,' असं मुंडे म्हणाल्या.