अंबाजोगाई ( बीड) -: पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील ऊसतोड कामगार युवक पांडुरंग रामभाऊ सोनवणे (वय -३३) याने रविवारी सकाळी शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच पांडुरंग आत्महत्या करण्यासाठी निघाला होता. मात्र गावचे सरपंच व इतरांनी त्याची समजूत काढली होती.
बीड लोकसभा मतदार संघातील मतमोजणी झाली. यात भाजपा च्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. या पराभवाचे शल्य मनात बोचत असल्याने व हा पराभव जिव्हारी लागल्याने अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळअंबा येथील युवकाने शेतात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.
पांडुरंग सोनवणे हा अत्यंत गरीब कुटुंबातील युवक होता.तो भारतीय जनता पक्ष व पंकजा मुंडे यांचा कट्टर समर्थक होता. हा पराभव त्याने खूप मनाला लावून घेतला.व जीवनयात्रा संपविली. पांडुरंग हा अल्पभूधारक आहे.त्याच्या कुटुंबात आई, वडील, पत्नी व एक मुलगी व लहान मुलगा आहे. या दुर्घटने मुळे पांडुरंग यांच्या कुटुंबावर संकट ओढवले आहे.
मतमोजणी दिवशीच केला होता आत्महत्येचा प्रयत्न.... -लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाल्यानंतर पांडुरंग सोनवणे हा पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर खूप दुःखी झाला होता. त्याच दिवशी त्याने आत्महत्या करणार असल्याचे ग्रामस्थांना बोलून दाखविले. गावचे सरपंच बाळासाहेब सोनवणे व ग्रामस्थांनी त्याची समजूत काढली. व त्याला आत्महत्येचा विचार मनातून काढून टाक.अशी विनंती ही केली होती.मात्र निराश झालेल्या पांडुरंग याने शेवटी आत्महत्या केली.