बीड जिल्ह्यात शासनाने अत्याचार करायच ठरवलंय, पंकजा मुंडेंची शरद पवारांना विनंती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 10:25 AM2021-04-28T10:25:51+5:302021-04-28T10:27:13+5:30
ही भयानक घटना माझ्या बीड जिल्ह्यातली आहे. त्या 22 लोकांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करावं, की त्यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याबद्दल संताप व्यक्त करावा, हे मला कळत नाही, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी अंबाजोगाईतील घटनेबद्दल संताप व्यक्त करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत.
बीड- जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कोरोनामुळे मृत झालेल्या तब्बल २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे मरण पावल्यानंतरही कोरोनाबाधितांची अवहेलना पाहून अनेकांची मने हेलावली. याप्रकरणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी आवाज उठवला आहे. तसेच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते शरद यांच्याकडे बीड जिल्ह्याकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.
एकाच अॅम्ब्युलन्समध्ये 22 जाणांचे मृतदेह कोंबून त्यांची विटंबना करण्यात आली होती. ही भयानक घटना माझ्या बीड जिल्ह्यातली आहे. त्या 22 लोकांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करावं, की त्यांच्या मृतदेहाची विटंबना केल्याबद्दल संताप व्यक्त करावा, हे मला कळत नाही, अशा शब्दात पंकजा मुंडेंनी अंबाजोगाईतील घटनेबद्दल संताप व्यक्त करत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मी ऑयसोलेटेड असल्याने मला ही बातमी उशिरा समजली.
रुग्णालयाच्या डिने स्वत:ची जबाबदारी कलेक्टरवर ढकलली, कलेक्टराचं असं झालंय की ते बोलूच शकत नाहीत. बीड जिल्ह्यात सध्या शासनानं अत्याचार करायचं ठरवलंय अन् प्रशासनाने हात टेकले आहेत. हे कॉम्बिनेश बीड जिल्ह्याच्या भविष्यासाठी आणि आत्ताच्या परिस्थिती अत्यंत भयानक आहे, असे म्हणत अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. पंकजा यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून या घटनेबद्दल संताप व्यक्त केलाय. तसेच, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बीड जिल्ह्याकडे जातीनं लक्ष द्यावे, अशी विनंतीही पंकजा यांनी केलीय.
बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हजारो नागरिक नव्याने बाधित होत आहेत. विशेषतः अंबाजोगाई तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांचेही प्रमाण वाढले आहे. रविवारी दुपारी चक्क २२ रुग्णांचे मृतदेह एकाच रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीकडे नेण्यात आले. यावेळी रुग्णवाहिकेत अक्षरशः मृतदेह कोंबले होते. मयत झालेल्या रुग्णांना अशा पद्धतीने अंत्यविधीसाठी नेण्याचा प्रकार अत्यंत धक्कादायक असून प्रशासनाला माणसांची किंमत राहिलेली नाही का? असा सवाल केला जात आहे.
एकाच रुग्णवाहिकेतून रुग्ण आणि मृतदेहांची वाहतूक
जिल्हा प्रशासनाकडून स्वाराती रुग्णालयाला अधिग्रहित केलेल्या दोन रुग्णवाहिका दिल्या आहेत. रुग्णांच्या तुलनेत ही संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे ज्या रुग्णवाहिकेतून मृतदेहांची वाहतूक केली जाते तीच रुग्णवाहिका नंतर रुग्णांची ने-आण करण्यासाठी वापरली जाते. रुग्णवाहिका निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायजरही देण्यात येत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे अशा प्रकारे कोरोनाचा प्रसार आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे नागरिकांचा जीव मात्र धोक्यात येत आहे.
अधिष्ठाता म्हणतात...
कोरोनाच्या पहिल्या लाटेत स्वारातीला पाच रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या, सध्या दोनच आहेत. वाढीव रुग्णवाहिकांसाठी आम्ही १७ मार्च रोजी जिल्हा प्रशासनाला पत्र दिले आहे; परंतु अद्याप रुग्णवाहिका मिळाल्या नाहीत. रुग्णवाहिकेच्या कमतरतेमुळे आपत्कालीन स्थितीत रुग्णांची ने-आण करण्यासाठी या रुग्णवाहिकांचा वापर झालेला असू शकतो. सॅनिटायजर देण्यात येत नसल्याची कोणत्याही रुग्णवाहिका चालकाची तक्रार अद्याप माझ्यापर्यंत नाही.
- डॉ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता, स्वाराती रुग्णालय. अंबाजोगाई.
उपविभागीय अधिकारी म्हणतात
यापुढे कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला की तातडीने अंत्यसंस्काराची कार्यवाही सुरू करण्यात येईल. दिवसभरातील मृतदेह जमा करून एकाच वेळी अंत्यसंस्कार करू नयेत, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
- शरद झाडके, उपविभागीय अधिकारी, अंबाजोगाई.