परळी : बीड जिल्हयातील शेतकरी ( heavy rain in Beed ) सध्या मोठया संकटात आहेत. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे त्यांना विमा मिळत नाही. जलसंपदा मंत्री, मदत पुनर्वसन मंत्री हे राजकीय कामासाठी जिल्हयात येऊन गेले. पण मंत्र्यांनी राजकीय दौरे करतांना इथल्या शेतकऱ्यांचाही विचार करणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही अशी खंत भाजपच्या राष्ट्रीय सचिव,माजी मंत्री पंकजा मुंडे ( Pankaja munde ) यांनी व्यक्त केली.
मुसळधार पावसाचा फटका बसून नुकसान झालेल्या परळीतालुक्यातील गावांचा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मंगळवारी भरपावसात दौरा केला. गावांत जाऊन नुकसानीची पाहणी करत संकटात सापडलेल्या ग्रामस्थ, शेतकऱ्यांना त्यांनी धीर झाला. नुकसान झालेल्यांना शासनामार्फत मदत मिळवून देण्याचा शब्द देत पिकांबरोबरच शेतजमिनीच्या नुकसानीचीही विशेष भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
वानटाकळीत पुराचे पाणी घुसले,शेतकऱ्यांनी चिंचेच्या झाडावर रात्र काढली
जोरदार पावसामुळे परळी तालुक्यातील पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्यांना मदत तर मिळालीच पाहिजे पण त्याचबरोबर जमिनीची माती देखील वाहून गेली आहे, त्याचीही विशेष नुकसान भरपाई शासनाने दिली पाहिजे. शेतकऱ्यांनी अस्मानी संकटाचा धैर्याने सामना करावा पण आता त्यांचेवर सुलतानी संकट येऊ नये याची खबरदारी सरकारने घ्यावी आणि वेळीच मदत द्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली