परळी (बीड ) : मोंढा भागातील स्टेट बँके ऑफ इंडिया (जुन्या हैद्राबाद बँके) च्या समोरून मुलासोबत दुचाकी वरून जाणाऱ्या महिलेचे डिकीत ठेवलेले ८९ हजार रुपये लुटल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. भर रस्त्यात चालत्या गाडीच्या डिकीतून रक्कम पळवल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; लाडझरी येथील नकेश रावसाहेब कांबळे (25) हे आपल्या आई सोबत मोंढा येथील एका बँकेत पैसे काढण्यासाठी दुचाकीवरून आले होते. बॅंकेतून ८९ हजार रुपये काढून त्यांनी ते एका प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून गाडीला असलेल्या कापडी डिकीत ठेवले. यानंतर नकेश आईला सोबत घेऊन दुचाकीवरून नातेवाइकांकडे निघाला. रस्त्यात स्टेट बँके ऑफ इंडियाजवळ ते आले असता गर्दीतून अचानक एकजण त्यांच्या गाडीच्या जवळ आला व त्याने डीकीची चैन उघडत आतील ८९ हजाराची रक्कम पळवली.
या प्रकरणी कांबळे यांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. सहायक पोलिस उपनिरीक्षक सुरेश खाडे, डीबी पथक चे जमादार बाबासाहेब बांगर, माधव तोटेवाड हे घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान,बँकेच्या सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार कैद झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.