बीड - जिल्ह्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या परळी मतदारसंघात पहिल्या तीन फेऱ्यांमधील निकालानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला आहे. धनंजय मुंडेंनी 0निवडणूक निकालात आघाडी घेतली असून धनंजय मुंडेंना 5 व्या फेरीअखेर 4417 मतांची आघाडी मिळाली आहे. तर पंकजा यांची पिछेहट झाल्याचे पाहायला मिळत आहे. येथील शक्तीकुंज वसाहतीमधील क्लब बिल्डींगमध्ये परळी विधानसभा मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.
परळी मतदारसंघाचा निकाल दुपारी साडेबारापर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. निवडणूक प्रचारातील आरोप प्रत्यारोपामुळे परळी मतदारसंघातील लढत राज्यात चर्चेचा विषय बनली होती. धनंजय मुंडेंच्या व्हायरल क्लिपनंतर पंकजा यांना आलेली भोवळ आणि त्यानंतर बदललेलं राजकीय वातावरण परिणामकारक ठरेल, असे सांगण्यात येत होते. 21 ऑक्टोबर रोजी या मतदार संघात एकुण 73 टक्के मतदान झाले. एकूण 3 लाख 6 हजार 204 मतदारांपैकी 2 लाख 23 हजार 300 मतदारांनी हक्क बजावला. यात 1 लाख 11 हजार 541 पुरुष तर 1 लाख 3 हजार 769 स्त्री मतदारांनी मतदान केले. एकुण 335 मतदान केंद्रावर हे मतदान झाले.