परळी: परळी विधानसभा मतदारसंघातील एकूण 363 मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजता मतदानास प्रारंभ झाला आहे. येथे महायुतीचे उमेदवार कृषिमंत्री धनंजय मुंडे व महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या मध्ये दुरंगी लढत होत आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत 7.08 टक्के मतदान झाले आहे. परळी विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख 37 हजार 976 एवढे मतदार आहेत. सकाळी सात ते नऊ दरम्यान 15 हजार 700 पुरुष व 8 हजार 236 महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर हे मतदारसंघातील परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत.
मतदारसंघातील तीन ठिकाणी मतदान प्रक्रिया दरम्यान गैरप्रकार होत असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे .परळी शहरातील जलालपूर व तालुक्यातील धर्मापुरी येथे मतदारांना दमदाटी करण्यात येत असल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला आहे. जलालपूर येथील काही महिलांना मतदान करण्यास गेले असता तुम्ही कोणाला मतदान करत आहेत असे म्हणून काही जण पाहू लागले व भीतीच्या वातावरणात या ठिकाणी महिला मतदान करीत आहेत.
धर्मापुरी केंद्रात कॅमेरा बंद, देशमुख येऊन थडकलेतसेच धर्मापुरी येथील एका केंद्रावर वेबकॉस्टिंगच्या कॅमेऱ्याची पिन लावण्यात आली नव्हती. त्यामुळे या ठिकाणी विना कॅमेरा मतदान चालू होते. या ठिकाणी तातडीने उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी भेट देऊन कॅमेरे चालू करण्यास भाग पडले. दरम्यान, राजेसाहेब देशमुख व काही कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचा प्रकार धर्मापुरी येथील मतदान केंद्रावर घडला आहे. राजेसाहेब देशमुख यांनी परळी मतदारसंघात बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला आहे. निवडणुकीत पैशाचा धुरळा व गुंडांचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप करीत राजेसाहेब देशमुख यांनी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. केंद्रीय सुरक्षा बलाच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती मतदान प्रक्रिया घेण्याची मागणी ही राजेसाहेब देशमुख यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
देशमुख यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारराजेसाहेब देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, परळी मतदार संघात चालू असलेल्या बोगस मतदानाविषयी आपण जिल्हा निवडणूक अधिकारी तथा बीडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे फोन द्वारे तक्रार केली आहे. परंतु त्यांनी केवळ पाहू असे उत्तर दिले आहे. अधिकाऱ्याविषयी देशमुख यांनी संशय व्यक्त केला आहे. परळी विधानसभा मतदारसंघातील धर्मापुरी येथील मतदान केंद्रातील कॅमेरे चालू नसल्याची तक्रार आली. त्या ठिकाणी क्षत्रिय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. तसेच नंदागौळ येथून एकाचा फोन आला आहे, त्या ठिकाणीही अधिकारी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती परळीची निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी दिली.