लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोराेनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता लहान मुलांनाही कोरोनाने घेरण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांत ० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांची संख्या अधिक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांची काळजी घ्यावी, घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने २७ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. मागील आठवड्यापासून तर रोज नव्या रुग्णांचा विक्रम होत आहे. सोमवारी तर तब्बल ५७५ नवे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली. यात ० ते १८ वर्षे वयोगटातील ५४ मुलांचा समावेश आहे. यावरून आता मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांनाही कोरोनाने घेरण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, पालकांनी मुलांबाबत गाफील राहू नये, उलटी, जुलाब, ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसताच तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच कोरोनाच्या भीतीपोटी इतर आजारांकडे दुर्लक्ष होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. लसीकरण, उपचारात हयगय करू नये. जरी दुर्दैवाने एखादे मूल कोरोनाबाधित आढळले तरी घाबरून जाऊ नये, इतरांप्रमाणेच त्याच्यावरही उपचार केल्याने ते ठणठणीत होते.
काय आहेत लक्षणे... लसीकरण आवश्यक
लहान मुलांमध्ये मोठ्यांपेक्षा जास्त प्रतिकारशक्ती असते. असे असले तरी पालकांनी काळजी घ्यावी. जुलाब, सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे दिसताच तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
कोरोनाच्या भीतीपोटी जे नियमित लसीकरण करणे आवश्यक असते, त्याकडे पालक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे डायरीया, धनुर्वात, न्यूमोनिया अशा आजारांना निमंत्रण मिळत आहे. यासाठी लसीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे बालरोग तज्ज्ञ सांगतात.
दुर्दैवाने एखादे बाळ कोरोनाबाधित आढळले तर त्याच्या उपचाराकडे दुर्लक्ष करू नये. नियमित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
काळजी घ्या, घाबरू नका !
कोरोनाबाधित रुग्णापासून दूर ठेवावे. बाळाला लक्षणे दिसताच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. अद्याप कोरोनापासून बालके दूर असली तरी काळजी घेणे आवश्यक आहे. बाळाला गर्दीत नेऊ नये.
- डॉ. संजय जानवळे
बालरोग तज्ज्ञ
हात धुऊनच बाळाला घ्यावे. घरातील इतर सदस्यांना थोडीही लक्षणे जाणवल्यास बाळाला दूर ठेवावे. लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती जास्त असते, त्यामुळे पालकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी.
- डॉ. विजय विघ्ने,
बालरोग तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय