परळी : राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असलेल्या येथील नगर परिषदेच्या विविध विषय समित्यांवर सभापतींची विशेष सर्वसाधारण सभेत शुक्रवारी बिनविरोध निवड करण्यात आली. एकूण पाच सभापतींपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला चार सभापतीपद तर शिवसेनेला एक सभापतीपद मिळाले आहे.
परळी न.प.च्या बांधकाम सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका अन्नपूर्णा शंकरराव आडेपवार, स्वच्छता व आरोग्य सभापती अन्वर मिस्कीन, पाणी पुरवठा सभापतीपदी ऊर्मिला गोविंदराव मुंडे, शिक्षण सभापती -गोपाळ आंधळे तर महिला व बालकल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या नगरसेविका गंगासागर बाबुराव शिंदे आदींची निवड करण्यात आली. विविध विषय समित्यांच्या सभापती निवडीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून एक वर्षाच्या खंडानंतर शिक्षण सभापती पदाची जबाबदारी गोपाळ आंधळे यांच्याकडे देण्यात आली आहे.
उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले. न.प.गटनेते वाल्मीक कराड यांच्या उपस्थितीत सभापतीपदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. प्रत्येक पदासाठी एकच अर्ज आल्याने या निवडी बिनविरोध पार पडल्या. यावेळी नगराध्यक्षा सरोजनी हालगे, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, मुख्याधिकारी अरविंद मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते. शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील नगरसेवक गोपाळ आंधळे व नगरसेविका गंगासागरबाई शिंदे यांना सभापती पदाची संधी मिळाली. नगरसेवक आंधळे यांच्याकडे शिक्षण समिती सभापतीपद तिसऱ्यांदा आले आहे.