परळी : कोरोनामुुुळे लॉकडाउन च्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शहरात विविध ठिकाणी जमणारी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार शहर प्रशासनाने फळ विक्रेत्यांना येथील तोतला मैदान खुले करून दिले असून या ठिकाणी विक्रीची सोशल डिस्टन्सिंग सह चोख व्यवस्था करण्यात आली आहे. नगरपालिका अधिकाऱ्यांनी शनिवारी याची अंमलबजावणी केली तसेच पोलिसांनी ही विनाकारण फिरणाऱ्या दुचाकीस्वारावर नियंत्रण आणले आहे
भाजीपाला विक्री करणारांना एकत्रित न बसू देता त्यांना शहरातल्या प्रत्येक भागात गल्ली गल्ली निहाय बसविण्यात आले आहे, जेणेकरून गर्दी होणार नाही. याशिवाय परळी शहराची प्रभागनिहाय चार भागात विभागणी करण्यात आली असून एका विभागाच्या व्यक्तीने कोणत्याही खरेदीसाठी दुसऱ्या विभागात यायचे नाही असेही ठरले आहे. त्यामुळे विविध खरेदीसाठी बाहेर पडणारी गर्दी आता मंदावली असून शिस्तबद्ध झाली आहे.
शहरातील तोतला मैदान येथे फळ विक्रेत्यांना विशिष्ट अंतर सोडून जागा ठरवून देण्यात आली असून, ग्राहकांना खरेदी करताना दोन ग्राहकांमध्ये सुरक्षित अंतर राखून गोल वर्तुळ आखून देण्यात आले आहेत.
भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू खरेदी करताना देखील अशाच प्रकारे सुरक्षित अंतर ठेवावे व शासनाच्या नियमानुसार एका विक्रेत्यासमोर ५ पेक्षा जास्त लोकांनी थांबू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.
परळीकर नागरिक या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत असून फळे भाजपला व अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीत आता शिस्त व सोशल डिस्टन्सिंग पाळलेली दिसत आहे.परळी नगर पालिका मुख्याधिकारी डॉ अरविंद मुंडेसह कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे,श्रावण घाटे,शंकर साळवे अदि न.पची टिम रस्त्यावर उतरले आणी त्यांनी बाजार पेठेतील भाजी विक्रेत्याना अंतर ठेऊन मार्किंग करुन दिली.तसेच ग्राहक व विक्रेते यांच्यातील अंतर असावे अशी माहिती दिली