परळी ( बीड ) : शहरापासून जवळच असलेल्या अंबाजोगाई रोडवरील एका हॉटेलच्या समोरील मोकळ्या जागेत रविवारी सकाळी नागनाथ मुंडे या रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. आज परळी पोलिसांनी कारवाई करत अवघ्या १२ तासात संशयीत दोघांना ताब्यात घेतले.
नागनाथ मुंडे (रा. वडगाव ता.जळकोट जि.लातुर) हे उदगीर येथील रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या प्रकरणी रविवारी उशिरा गुन्हा नोंद झाला. आज सकाळी पोलिसांनी कारवाई करत सचिन बंडु फड (20) व गणेश सुभाष मुंडे (21) यांना कन्हेरवाडी शिवारातून ताब्यात घेतले, अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिली.
घटनेनंतर अवघ्या १२ तासात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहर पोलीस ठाण्याचे एएसआय श्रीकांत डोंगरे, जमादार भास्कर केंद्रे यांच्यासह पथकाने केली.