परळी (जि. बीड) : शहरातील बँक कॉलनीत बोलावून घेऊन पैशाच्या कारणावरून मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्यावर गोळी झाडून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी घडली होती. या प्रकरणात पाचजणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात वापरण्यात आलेला गावठी कट्टा व काेयते जप्त करण्यात आले आहेत.
मुख्य आरोपींना मदत केल्याच्या संशयावरून केज व धारूर पोलिसांनी रविवारी आसाराम दत्ता गव्हाणे (वय २३, रा. वाघोली, ता. धारूर), मयूर सुरेशराव कदम (वय २९, रा. केज), रजतकुमार राजेसाहेब जेधे (वय २७, रा. जवळगाव, ता. अंबाजोगाई), अनिल बालाजी सोनटक्के (वय २३, रा. धारूर) या चौघांना ताब्यात घेतले. त्यांना परळी शहर पाेलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय लोहकरे यांनी सोमवारी दिली. अजूनही मुख्य आरोपी असलेले शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत ऊर्फ बबन गित्ते, मुकुंद ज्ञानेश्वर गित्ते, वाघबेट, महादेव उद्धव गित्ते, राजाभाऊ नेहरकर, राजेश वाघमोडे हे मोकाटच आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके नेमण्यात आली आहेत.
आरोपींना मदत केल्याचा संशय : ६ जण पोलिसांच्या ताब्यातपरळी येथील बँक कॉलनीत शनिवारी रात्री घडलेल्या गोळीबार घटनेतील आरोपींना मदत करणाऱ्या संशयित ६ जणांना केज पोलिसांनी रविवारी सायंकाळी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे चार जणांवर अटकेच्या कारवाईची प्रकिया सुरू करण्यात आली आहे.-नंदकुमार ठाकूर, जिल्हा पोलिस अधीक्षक बीड.