परळी: राज्यातील जनतेच्या, शेतकरी, विद्यार्थी, कष्टकरी, बारा बलुतेदार यांच्या हिताचे काम नवीन सरकारच्या माध्यमातून घडावे अशी प्रार्थना महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य, आमदार गोपीचंद पडळकर यांनी श्री प्रभू वैद्यनाथ चरणी केली. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे श्रावण मासानिमित्त रविवारी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दर्शन घेतले.
यावेळी पडळकरांनी वैद्यनाथ मंदिरातील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यांच्यासोबत भीमराव सातपुते, शिवदास बिडगर, कमलाकर बिडगर, सुभाष बिडकर, सतीश बिडगर सर्जेराव बिडगर, अमोल बिडगर, नारायण कुंडगीर, सुरेश बंडगर , अमोल सातपुते आणि इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रावण महिन्यानिमित्त प्रभू वैद्यनाथाचे दर्शन झाले याचा आपल्याला आनंद वाटला असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगून राज्यातील सर्वांच्या हिताचे काम नवीन सरकारच्या माध्यमातून घडावे अशी प्रार्थना प्रभू वैद्यनाथास केली असल्याची माहिती त्यांनी लोकमतला बोलताना दिली. परळी तालुक्यातील डाबी येथील क्रांतिवीर राजे धर्माजी नाईक मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दर्शनासाठी आमदार गोपीचंद पडळकर हे रविवारी परळी दौऱ्यावर होते.
आमदार पडळकर यांनी डाबी येथे जाऊन दर्शन घेतले तसेच परळी तालुक्यातील दाऊतपुर येथील सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेतले व चालू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाला भेट दिली. परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील श्री सोमेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन पडळकरांनी गोपीनाथ गड येथे जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधी स्थळाचेही दर्शन घेतले. यावेळी दाऊदपूर येथील शिवदास बिडगर यांनी आमदार पडळकरांचे जोरात स्वागत करण्यात आले.