....
धारूरला जाणारे तिन्ही रस्ते बंद
धारूर : तालुक्यात तीन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत, तर नदी-नाले, ओढे देखील दुथडी भरून वाहू लागले आहेत. तालुक्याला जोडणारे रस्ते बंद झाले. जिल्ह्यातील मणकर्णिका, अरणवाडी तलाव, कुंडलिका, तांदळवाडी तलाव भरले आहेत. यामुळे नद्यांना पूर आला आहे. किल्लेधारूर-अंबाजोगाई रोडवरील आवरगावच्या फुलावर पाणी आल्याने हा रस्ता बंद झाला. किल्लेधारूर-रुई धारूर, किल्लेधारूर चिंचवण हा रस्ता बंद झाल्याने तालुक्याचा काही काळ संपर्क तुटला आहे.
....
कचऱ्यामुळे पाणी तुंबले, पालिका कर्मचाऱ्यांची धावपळ
परळी : पावसामुळे सरस्वती नदीच्या पुरात वाहून आलेल्या कचऱ्यामुळे गंगासागर नगरमधील पुलाजवळ पाणी तुंबले. लागलीच शिवसेना परळी तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे यांनी नगरपरिषदेची प्रशासकीय यंत्रणा कामाला लावून पुलाखाली तुंबलेले कचरा काढायला लावला. यावेळी परळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे व कर्मचारी उपस्थित होते.
...
पंचनामे तातडीने करण्याची मागणी
नांदूर घाट : केज तालुक्यातील नांदूर घाट परिसरात झालेल्या जोरदार पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जवळपास १०० टक्के पिके पाण्यात गेली आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तरी पिकांचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.