किल्लेधारूर : तालुक्यातील घागरवाडा येथील रहिवासी परमेश्वर बालासाहेब जाधवर (२६) हा जवान राजस्थान जैसलमेर येथे युद्धाभ्यासात शहीद झाल्याची घटना काल सांयकाळी घडली. ५१४ वायुसेना रेजिमेंटचे सुभेदार अंकुश वळकुंडे यांनी दिलेल्या माहितीवरुन उद्या दुपारनंतर शहिद जवानाचे पार्थिव घागरवाडा येथे पोहोचून शासकिय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
तालुक्यातील घागरवाडा येथील परमेश्वर जाधवर यांची पाच वर्षापूर्वी बीड येथील सैन्य भरतीत भारतीय सैन्य दलात निवड झाली होती. मुळ शेतकरी असलेल्या बालासाहेब जाधवर व भाऊ राजेभाऊ जाधवर यांचे संयुक्त कुटूंब गावालगतच शेतावर राहतात. अत्यंत गरीब कुटूंब असलेल्या जाधवर कुटूंबियातील परमेश्वर हा आधार होता. परमेश्वरचा लहान भाऊ रामेश्वर हा पोलिस भरतीसाठी प्रयत्नशील आहे तर विक्रम या भावाची दि.१७ नोव्हेंबर रोजीच सैन्य भरतीत शारीरिक चाचणी झाली आहे.
परमेश्वर याचे माध्यमिक पर्यंतचे शिक्षण उमरी ता.माजलगाव येथे तर उच्च शिक्षण पिंपळनेर येथे झाले. त्याच्या पश्चात पत्नी दमावंती, दिड वर्षाची मुलगी विद्या, आई, वडील व तीन भाऊ असा परिवार आहे. दि.१९ सांयकाळी ६ ते सात च्या दरम्यान त्याचे कुटूंबियाशी शेवटचे बोलणे झाले. यानंतरच युद्धाभ्यासा दरम्यान परमेश्वर यास वीरमरण आले तर एक सैनिक जखमी झाल्याची घटना घडली. सध्या परमेश्वर राजस्थान मधील जैसलमेर येथे कार्यरत होता. त्याच्या वीरमरणामुळे गावात शोकाकुल वातावरण आहे.
भावाचे देशसेवेचे स्वप्न पूर्ण करणारशहिद परमेश्वरचा लहान भाऊ विक्रम यानेही सैन्य दलात जाण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी येथे त्याची शारीरिक चाचणी पुर्ण झाली आहे. लेखी परिक्षेत यश मिळवत त्याने भावाचे देशसेवेचे अपूर्ण काम पुढे नेण्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.