लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : ऐन मकरसंक्रांतीच्या दिवशी शहरातील शंकरपार्वती नगरातील बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक आर.डी. नाकाडे व कन्हेरवाडी गावातील शिक्षक भक्तराम रघुनाथ मुंडे यांच्या घरात रविवारी रात्री चोरट्यांनी धुडगूस घालत दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. दोन्ही घटनांत नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आतापर्यंत तिघांना ताब्यात घेतले आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील कन्हेरवाडी रोडवरच असलेल्या शंकर पार्वती नगरमध्ये बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक आर.डी.नाकाडे यांचे घर आहे. नाकाडे कुटूंबासह बाहेरगावी गेले आहेत हीच संधी साधून रविवारी मध्यरात्री चौघांनी पाठीमागील संरक्षक भिंतीवरून घरात प्रवेश केला. संरक्षण भिंतीच्या जवळ गोटे व विटांचे तुकडे चोरट्यांनी ठेवल्याचे दिसले. आतील खोलीत जावून कपाटाची उचकापाचक केली, परंतु यात काय गेले आणि काय राहिले, हे समजू शकले नाही. घरात आवाज येत असल्याचे शेजाºयांच्या लक्षात आले. त्यांनी इतरांना जागे केले. येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर कापसे यांनीही धाव घेतली.
पकडलेला चोर मध्यप्रदेशचा रहिवासीशंकर पार्वतीनगरमध्ये झालेल्या चोरीची रहिवाशांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. गस्तीवर असलेले जमादार बांगर, माधव तोटेवाड यांनी धाव घेतली.परंतु त्यांच्या दुचाकीचा आवाज ऐकून चोरट्यांनी धूम ठोकली. यामध्ये एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. हा चोर मध्यप्रदेशचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचे सहकारीही मध्यप्रदेशचेच आहेत.
कन्हेरवाडीतही चोरीपरळी तालुक्यातील कन्हेरवाडीतील भक्तराम रघुनाथ मुंडे यांना पहाटे पाच वाजेच्या सुमारास कुत्र्यांचा आवाज आल्याने ते जागे झाले. त्यांनी दुस-या खोलीकडे पाहिले असता घरात चोरी झाल्याचे दिसले. ते तात्काळ बाहेर आले. त्यांना कन्हेरवाडीकडून दोन पोलीस दुचाकीवर येत असल्याचे दिसले. त्यांनी हा प्रकार पोलिसांना सांगितला.
मुंडेसह जमादार बाबासाहेब बांगर व माधव तोटेवाड यांनी चोरांचा शोध घेतला. तेव्हा त्यांना समता नगरकडे दोघेजण दिसले. पोलीसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय बळावला. झडती घेतली असता एकाच्या खिशात मुंडे यांच्या घरात झालेल्या चोरीतील नोटा असल्याचे दिसले. त्यांना लागलीच ताब्यात घेतले.४ही कारवाई परळी शहरचे बांगर, तोटेवाडसह जेटेवाड, रमेश तोटेवाड, चालक गडदे व गृहरक्षक दलाच्या दोन जवाणांनी केली. चार पैकी दोघे चोर फरार असून चोरीचा मुद्देमाल फरार आरोपींकडे असल्याचे सांगण्यात आले.
४ मुंडे यांच्या घरातून ११ तोळे सोने १ लाख ६५ हजार रूपये रोख असा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. स्थानिग गुन्हे शाखेचे सपोनि दिलीप तेजनकर, भास्कर केंद्रे, नरेंद्र बांगर हे सुद्धा चौकशीसाठी परळीत दाखल झाले होते. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण केले होते.४दरम्यान, एकाच रात्री दोन मोठ्या चोºया झाल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे.