कडा (जि.बीड) : पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे बर्ड फ्लूने कावळ्याचा मुत्यू झाल्यानंतर याचे लोण आष्टी तालुक्यात पसरले आणि शिरापूर, धानोरा, पिंपरखेड येथेदेखील पक्षी व कोंबड्यांचा मुत्यू झाला. नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने त्या तीन गावांतील पक्षाचा अहवाल काय येणार म्हणून पशुसंर्वधन विभागासह तालुक्यातील जनतेची धाकधूक वाढली होती. मंगळवारी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती डाॅ. मंगेश ढेरे यांनी लोकमतला सांगितले.
आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे साडेचारशे कोंबड्या दगावल्या होत्या, त्याचबरोबर धानोरा, पिंपरखेड येथे दोन पक्षी मृत अवस्थेत आढळून आल्याने या तीनही गावांतील पंचनामा करून पक्षाचे नुमने पशुसंर्वधन विभागाने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. नमुने पाठवून चार दिवसांचा कालावधी उलटला होता. नेमका अहवाल काय येतो या चिंतेने गावासह पशुसंर्वधन विभागाची धाकधूक वाढली होती. मंगळवारी दुपारी पशुसंर्वधन विभागाला अहवाल प्राप्त झाला असून, त्या कोंबड्यांसह पक्षी निगेटिव्ह आले. शेतकरी व पोल्ट्री व्यवसायवाल्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांनी लोकमतला सांगितले.