धारूर : खामगाव पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर अरणवाडी साठवण तलावालगत पाचशे फूट रस्ता उंचीचे काम सुरू आहे. या रस्त्यावर मागील दहा दिवसांपूर्वी गुत्तेदाराने कोरडी खडी टाकली आहे. मात्र, खडी टाकल्यानंतर यावर काहीच न करता गुत्तेदार पसार झाला आहे. यामुळे येथील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
खामगाव - पंढरपूर हा राष्ट्रीय मार्ग धारूर येथील घाटातून जात आहे. येथील घाटालगत अरणवाडी आठवण तलावाचे काम सुरू आहे. हा रस्ता तलावाबाहेरून काढण्यात आला आहे. रस्त्याचा पाचशे फूट अंतराचा भाग हा तलावात येत आहे. तलावाची धार कोंडल्यास या रस्त्यावर भविष्यात पाणी येण्याची शक्यता असल्याने, मागील काही महिन्यांपासून सदरील रस्त्याची उंची वाढविण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. सदरील रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले होते. रस्त्यावर मुरुम टाकून उंची वाढविली आहे. उंची वाढविताना काही भागांत अर्धवट मुरुम टाकण्यात आला होता. रस्त्यावर मुरुम टाकल्यानंतर मागील अनेक महिन्यांपासून काम बंद होते. काही ठिकाणी रुंद तर काही ठिकाणी अगदी अरुंद असे काम करण्यात आले आहे. ऐन वळणाच्या ठिकाणी रस्ता अरुंद करण्यात आल्याने भविष्यात अपघाचा धोका निर्माण होणार होता. तलावाचे पाणी रस्त्यावर येऊ नये, म्हणून रस्त्याची उंची वाढविली आहे. मात्र, उंची वाढवितांना वळणाच्या ठिकाणी रस्ता रुंद करण्याची गरज होती. यामुळे दोन वाहने जाण्यास अडचण येणार आहे. रस्ता तलावातून जात आहे आणि अरुंद असल्याने भविष्यात धोका आहे. त्यातच मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे दोन ते तीन ठिकाणी हा रस्ता खचून गेला होता. त्यावर गुत्तेदाराने खचलेल्या जागी मुरुम टाकला आहे. सध्या तलावाचे धार कोंडण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे तलावाच्या कामाबरोबरच रस्ता उंच करण्याचे कामही गतीने होणे गरजेचे होते, परंतु हे काम मागील अनेक महिन्यांपासून धिम्या गतीने सुरू आहे. याकडे संबंधित रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे, त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला, तर संपर्क होऊ शकला नाही.
----
पावसाळ्याआधी काम गरजेचे
दहा पंधरा दिवसांपूर्वी मुरुम टाकलेल्या ठिकाणावर कोरडी खडी टाकण्यात आली असून, ती रस्त्यावर पसरवली आहे. त्यावर मुरुम अथवा डांबरही टाकण्यात आलेले नाही. खडी टाकल्यानंतर, त्यावर काहीच न करता गुत्तेदार मात्र पसार झालेला आहे. यामुळे येथे वाहतुकीस अडथळा येत आहे. सध्या या रस्त्याच्या बाजूने वाहतूक अडवली असली, तरी पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे, परंतु गुत्तेदार मात्र खडी टाकून प्रसार झाल्यामुळे हे काम वेळेत होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
===Photopath===
080521\img-20210508-wa0110_14.jpg