बीड : मागील काही महिन्यांपासून पेट्राेल व डिझेलच्या दरात झालेली वाढ ‘धीरे से झटका, जोर से लगे’ असा अनुभव सामान्य जनतेला देत आहे. ५० पैसे, तर ८० पैसे तर कधी एक रुपयांनी लिटरमागेे भाव वाढत असल्याने जनतेनेही फारशी वाढ नाही म्हणून नरमाई दाखविली, मात्र हळूहळू झालेल्या दरवाढीचे परिणाम आता चटके देत आहेत. तीन वर्षांत लिटरमागे डिझेलचे दर ३० रुपयांनी वाढल्याने वाहन मालकांनाही प्रवासी वाहतुकीचे दर १५ ते २० टक्क्यांपर्यंत वाढवावे लागले आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग टाळण्यासाठी किंवा आपले काम तत्परतेने व्हावे म्हणून विशेष वाहन करून प्रवास करणाऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. कोरोनामुळे निर्बंध आणि प्रवासी भाडे नसल्याने दीड वर्षे वाहने उभीच होती. मात्र वाहनाचे मेटनन्स, घेतलेल्या कर्जाचे व्याज आणि घरप्रपंचाचा खर्च चुकलेला नाही. १५ ऑगस्टपासून मुभा दिली असलीतरी मंदिरे बंद आहेत, लग्नसोहळे नाहीत, सार्वजनिक कार्यक्रम, पर्यटन बंद आहे. त्यामुळे प्रवासी वाहनांना भाडे मिळत नसल्याचे मालकांनी सांगितले.
असे वाढले पेट्रोल-डिझलेचे दर (प्रतिलिटर)
पेट्रोल - डिझेल
जानेवारी - २०१९ ७६ - ६४
जानेवारी २०२० ९० - ६५
जानेवारी २०२१ ९२ - ८१
ऑगस्ट २०२१ १०९ - ९७
प्रवासी वाहनांचे प्रति कि.मी.दर
वाहनाचा प्रकार प्रति कि.मी. दर
कार -- १२
जीप -- १४
सिक्स प्लस वन - १७
गाडीचा हप्ता कसा भरणार?
कोरोनाकाळात पंधरा- सोळा महिने भाडे नव्हते. मालक व चालकांना खूप आर्थिक अडचणी आल्या. आता परवानगी असलीतरी प्रवासी नाहीत. भाडे मिळत नाही. मोजक्या ठिकाणचे भाडे मिळते; पण डिझेल दर वाढल्याने मालकाला परवडत नाही, वाहनासाठी कर्ज घेणारे मालक फेड कशी करणार? -- रतन थोरात, वाहनचालक, बीड
-------
काेरोनाकाळात भाडे क्वचित मिळायचे, पण नियमांचा अडसर हाेता. डिझेलचे दर कमालीचे वाढले. त्यामुळे वाहन भाडे १५-२० टक्क्यांनी वाढले आहे. लोक जुन्या दराने प्रवासाची मागणी करतात, मग परवडणार कसे? सध्या श्रावण असूनही भाडे नाही. त्यामुळे वाहने जागेवरच उभी आहेत; मात्र खर्च वाढते आहेत. -- बबलू तांदळे, वाहनचालक, बीड
--------------