बीड : चालत्या बसमध्येच प्रवाशाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. बसचालकाने भरधाव वेगाने बस जिल्हा रूग्णालयात आणली. डॉक्टरांनी तपासून प्रवाशाला मृत घोषित केले. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता पुणे - बीड या बसमध्ये नायगावजवळ घडली.
सय्यद जलील (६५ रा.मोमीनपुरा, बीड) असे मयत प्रवाशाचे नाव आहे. बीड आगाराची पुणे - बीड ही बस (एमएच २० बी.एल.२६७४) बीडकडे येत होती. सय्यद हे जामखेड येथून बसमध्ये बसले होते. पाटोदा तालुक्यातील नायगावच्या पुढे साधारण एक किमी.च्या पुढे आल्यावर सय्यद यांना हृदयविकाराचा धक्का आला. बाजुच्या प्रवाशांनी आरडाओरड केली. त्यानंतर चालकाने बस माघारी घेत नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेली. येथील डॉक्टरांनी सय्यद यांना तपासून जिल्हा रूग्णालयात हलविण्याचे सांगितले. येथे रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने त्याच बसमधून त्यांना जिल्हा रूग्णालयाकडे आणण्यात आले. बसचालक सी.टी.कदम यांनी रस्त्यात एकाही प्रवाशाला न उतरता भरधाव वेगाने बस जिल्हा रूग्णालयात दाखल झाली. येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानक प्रमुख बी.व्ही.बनसाडे, वाहतूक निरीक्षक विशाल राऊत यांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. त्यानंतर चालक कदम व वाहक बी.एस.चव्हाण यांनी बस स्थानकात आणली. येथे वाहक चव्हाण यांच्याकडे बनसोडे यांनी घटनेची माहिती घेतली. उशिरापर्यंत या प्रकरणाची कोठेही नोंद नव्हती.