बीड : बसमध्येच सय्यद जलील (६५ रा.मोमीनपुरा, बीड) यांना हृदयविकाराचा झटका आला. चालकाने भरधाव वेगाने ही बस जिल्हा रूग्णालयात आणली. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ही घटना मंगळवारी दुपारी एक वाजता पुणे-बीड या बसमध्ये नायगावजवळ घडली.
बीड आगाराची पुणे-बीड ही बस (एमएच २० बी.एल.२६७४) बीडकडे येत होती. सय्यद हे जामखेड येथून बसमध्ये बसले होते. पाटोदा तालुक्यातील नायगावच्या एक कि.मी. पुढे आल्यावर सय्यद यांना हृदयविकाराचा धक्का आला. प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर चालकाने बस माघारी घेत नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेली. येथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बसमधून त्यांना जिल्हा रूग्णालयाकडे आणण्यात आले. चालक सी.टी.कदम यांनी एकही ठिकाणी थांबा न घेत ही बस जिल्हा रूग्णालयात नेली. येथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. उशिरापर्यंत या प्रकरणाची कोठेही नोंद नव्हती.