- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई - येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील अतिदक्षता विभागातील लिफ्ट बंद पडल्यामुळे रूग्णांचा झोळीतून प्रवास सुरू आहे. रूग्णांच्या नातेवाईकांनाच एकत्रित येवून रूग्णाला झोळीतून अनेकदा खालीवर नेण्याची वेळ येते. ही स्थिती सातत्याने निर्माण होवूनही लिफ्ट दुरूस्तीकडे मात्र रूग्णालय प्रशासनाची डोळेझाक होत असून हे रूग्णांना त्रासदायक ठरत आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय हे सामान्य रूग्णांसाठी आधार केंद्र आहे. रूग्णालयात उपचारासाठी दुरून रूग्ण येतात. अंबाजोगाई रूग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या इमारतीत दोन लिफ्ट बसविण्यात आल्या आहेत. 10 वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या या लिफ्ट प्रारंभीपासूनच त्रासदायक ठरल्या आहेत. बसविण्यात आलेल्या लिफ्ट या उच्चप्रतिच्या नसल्याने त्यात सातत्याने बिघाड होतो. वर्षभरात किमान 7 ते 8 महिने या लिफ्ट बंदच स्थितीतच असतात. याचा मोठा फटका रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागतो.
विशेष म्हणजे या इमारतीत अतिदक्षता विभाग, मेडीसीन विभागाचे दोन वार्ड व बालरूग्ण कक्ष असे विभाग आहेत. यातील सर्वच रूग्ण एक तर वृद्ध किंवा बालके असतात. लिफ्ट बंद पडल्यास या रूग्णांना एक्सरे, रक्ततपासणी, सोनेग्राफी, सिटीस्कॅन, एम.आर.आय.तपासणी अशा विविध तपासण्यासाठी सातत्याने इतरत्र न्यावे लागते. अशा स्थितीत रूग्णाच्या नातेवाईकाकडे किमान तीन ते चार नातेवाईक त्या रूग्णाला झोळी करून नेण्यासाठी अत्यावश्यक असतात. जिथे माणसांची कमतरता होते. त्या रूग्णाला इतरत्र तपासण्यासाठी न्यायचे म्हटले तर त्या रूग्णाच्या कुटुंबियासमोर मोठा प्रश्न निर्माण होतो. रूग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी या कामी मदतही करत नाहीत. रूग्णाच्या नातेवाईकांनाच या कामी लोकगोळा करून आपल्या रूग्णासाठी खडपट करावी लागते. हा प्रकार रूग्णालयात सातत्याने सुरू आहे.
दुरुस्ती अडकली लालफितीत रूग्णायातील लिफ्ट सातत्याने बंद पडते व ती दुरूस्तीसाठी रूग्णालय प्रशासन बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करते. रूग्णालय प्रशासन व बांधकाम विभाग यांच्या लालफितीच्या कारभारामुळे नाहक त्रास रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना होतो. ही स्थिती वारंवार येवून ही रूग्णालय प्रशासनाचे याकडे दुर्लक्षच आहे. यापुर्वी अनेक डॉक्टरांनी आपल्या वेतनातील पैसो जमा करून लिफ्ट दुरूस्ती केली होती. तरीही शासनाला याचे गांभीर्य नाही. आता ही लिफ्ट नादुरूस्त असल्याचा मोठा फटका रूग्ण निमुठपणे सहन करत आहेत. या संदर्भात रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे यांच्याकडे विचारणा केली असता सदरील बंद पडलेली लिफ्ट दुरूस्तीसाठी बांधकाम विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी लोकमशी बोलताना सांगितले.