सखाराम शिंदे/ पोलीस म्हटले की, सामान्य नागरिक त्यांच्यापासून दोन हात दूरवर राहतो. मात्र गेवराईत असा पोलीस आहे की, तो आपले कर्तव्य करून सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन ‘आधार माणुसकी ग्रुप’च्या माध्यमातून गरजूंना आधार देण्याचे काम करीत आहे. त्यामुळे ते गरिबांचे आधारस्तंभ ठरू लागले आहेत. पर्यावरण संवर्धनाबरोबर गरजू व गरजवंताना व मुक्या प्राण्याला आधार माणुसकी नावांप्रमाणेच आधार देत आहे. तो म्हणजे वर्दीतला दर्दी माणूस म्हणजे पोलीस अंमलदार रंजित पवार व ग्रुपचे सर्व सदस्य होय.
गेवराई पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार रंजित पवार हे गेल्या दोन वर्षांपासून येथील ठाण्यात रुजू झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आधार माणुसकीचा ग्रुपच्या माध्यमातून ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ या अंभगाप्रमाणे कोरोना महामारीत आपले कर्तव्य करता करता पोलिसांच्या मदतीला धाऊन आलेत. कारण कडक लाॅकडाऊनच्या काळात तब्बल अडीच ते तीन महिने बाजारपेठा कडकडीत बंद होत्या. अशा काळात हाॅटेल, खानावळ सर्व काही बंद होते. त्यावेळी पोलीस, डाॅक्टर, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी हे सर्व जण चेकपोष्ट, चौकाचौकांत तसेच विविध ठिकाणी आपले कर्तव्य करीत होते. यावेळी अनेक वेळा पाणीही मिळत नव्हते. हेच पाहून पोलीस अंमलदार रंजित पवार यांनी आधार माणुसकीचा ग्रुपच्या माध्यमातून भर उन्हात व रस्त्यावर कर्तव्य करणाऱ्या सर्वांना पाणी, नाष्ट्याला पोहे देण्याचे काम केले. कडाक्याच्या थंडीत रस्त्याच्या कडेला, बसस्थानकावर अशा विविध ठिकाणी गरीब थंडीत कुडकुडत होते. अशा नागरिकांचा थंडीपासून बचाव व्हावा यासाठी ग्रुपच्यावतीने ४० ब्लँकेटचे वाटप केले. नंतर तालुक्यातील पर्यावरण संतुलित राहण्यासाठी व चांगला ऑक्सिजन मिळण्यासाठी भोजगाव, देवपिंपरी, राक्षसभुवन, बंगाली पिंपळा, सिरसमार्ग, सहारा अनाथालय रोडसह विविध ठिकाणी जवळपास ६०० च्या वर करंज, सप्तपर्णी, वड, पिंपळ, गुलमोहर, लिंब, चिंच, आवळा अशा वृक्षाचे वृक्षारोपण केले. येथेच न थांबता समाजसेवेचे व्रत अखंडपणे ते चालूच ठेवत. या ग्रुपसाठी स्वत: रंजित पवार, ग्रुपचे शिलेदार यात किरण बेदरे, रामनाथ बेदरे, किशोर राऊत, पोलीस अंमलदार दत्ता चव्हाण, पोलीस अंमलदार नितीन राठोड, पोलीस अंमलदार ऋषिकेश पोटे, हनुमान सूळ, रवी उपाडे, संभाजी बेदरे, गणेश जराड, हरिभाऊ शिंदे, नितीन संत, भैय्या दातार, किरण मोरे, अण्णासाहेब डोके, प्रकाश गाडे, नवनाथ ठोसर, विठ्ठल आडाळे सह असंख्य सदस्य कार्य करीत आहेत.
...
मुक्या प्राण्यांसाठीही पाणवठे मुक्या प्राण्यांचाही विचार त्यांच्या मनात आला. भर ऊन्हात मुक्या प्राण्याला व पक्ष्यांसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून ग्रामीण भागात तसेच शहरातील विविध ठिकाणी १५ पाण्याचे पाणवठे ठेवले. कोणाचा वाढदिवस असला की केक, फटाके, सत्काराला हार तुऱ्यावर होणार खर्च टाळण्यासाठी व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी ज्या व्यक्तीचा वाढदिवस असेल, अशा व्यक्तीला झाड भेट देऊन त्यांचा वाढदिवस ग्रुपच्यावतीने केला जातो. शिरूर कासार तालुक्यातील आजोळ प्रकल्प येथे दहा सिमेंटचे बाकडे देण्यात आले.
......