लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ग्रामपंचायत पातळीवरील कारभार पारदर्शी होण्यासाठी पेपरलेस करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींचे अभिलेखे ३१ मार्च रोजीच पूर्ण करण्यात आले. या प्रक्रियेत तालुका राज्यात अव्वल ठरला असून पेपरलेसचे हे पहिले पाऊल मानले जात आहे.
पंचायतराज अंतर्गत सर्व कामे पारदर्शीपणाने होण्यासाठी तसेच योजनांच्या निधीचा व्यवहार स्पष्ट दिसावा म्हणून ग्रामपंचायतींसाठी एनआयसीने प्रक्रिया सॉफ्ट नावाचे सॉफ्टवेअर तयार केले आहे. त्याचा भारतभर वापर होतो. या माध्यमातून महाराष्टÑात ग्रामपंचायतींसाठी आलेल्या निधीचा खर्च दिवसनिहाय तसेच माहवारी पुस्तिकेत नोंदवून ३१ मार्चला अभिलेखे बंद केले जातात. २०१७-१८ या आर्थिक वर्षात ३१ मार्च रोजी अभिलेखा बंद करणारा पाटोदा तालुका राज्यात अव्वल ठरला आहे. १ एप्रिल २०१७ पासून अभिलेख्याच्या नोंदी ठेवण्यात सातत्य राखल्याने ३१ मार्च २०१८ रोजी वार्षिक पुस्तिका आॅनलाईन करण्यात हे यश मिळाले.महिनाभरापासून बैठकजिल्ह्यात पेपरलेस ग्रामपंचायतीबाबत सीईओ अमोल येडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील भोकरे यांनी मागील महिन्यापासून बैठक घेऊन मार्गदर्शन केले होते तसेच या प्रक्रियेला गती आणली होती.
भारतभर पाहता येतात नोंदीपारदर्शिता तसेच ग्रामपंचायतच्या ३३ अभिलेखांच्या नोंदवह्या पूर्ण आहेत की नाही हे या सॉफ्टवेअरद्वारे नोंदी भारतात कोठेही ग्रामपंचायतचे अभिलेखे पाहता येतात. यापुढील टप्प्यात कागदोपत्री रेकॉर्ड न ठेवता माहितीचे डिजिटलायझेशन करण्यात येणार आहे. यात ग्रामपंचायत पातळीवर दिल्या जाणाऱ्या सर्व प्रमाणपत्रांचाही समावेश आहे.
६५ ग्रामपंचायतमध्ये ई-ग्राम सॉफ्टवेअरजिल्ह्यातील १०३१ पैकी ६५ ग्रामपंचायतींमध्ये इ-ग्राम सॉफ्टवेअर प्रणालीचे काम अद्याप बाकी आहे. यात ३३ अभिलेखे, मासिक व ग्राम सभेचे रेकॉर्डही नोंदविले जाणार आहेत. पाटोदा तालुक्याने आघाडी घेतली असली तरी इतर तालुके मात्र याबाबत उदासीन आहेत. काही ठिकाणी इंटरनेट, वीजपुरवठ्याच्या अडचणी देखील उभ्या आहेत.