लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील कोरोनाची एकूण रूग्णसंख्या मागील काही महिन्यांच्या तुलनेत कमी होत असली तरी अद्यापही धोका टळलेला नाही. दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील पाटोदा, वडवणी, धारूर, माजलगाव आणि पाटोदा तालुक्याची वाटचाल सध्या कोरोनामुक्तीकडे सुरू आहे. तर बीड, आष्टी आणि अंबाजोगाई तालुक्यात ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरून समाेर आले आहे. बीड तालुक्यात सर्वाधिक कोरोनाबळी असल्याचेही दिसते.
जिल्ह्यात जुलै ते ऑक्टोबर महिन्यात ॲक्टिव्ह काेरोना बाधितांची संख्या दररोज १ हजाराच्या पुढे असायची. तसेच मृत्यूही वाढत होते. परंतु डिसेंबर, जानेवारी महिन्यात हा आकडा कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १७ हजार लोकांना कोरोनाची बाधा झाली. असे असले तरी रिकव्हरी रेट ९५ टक्केच्या पुढे असल्याने दिलासा मिळत आहे. तसेच नव्या बाधित रूग्णांची संख्याही कमी होत आहे. आता जिल्ह्यासाठी केवळ मृत्यूदर कमी होत नसल्याने चिंतेची बाब आहे. आरोग्य विभाग व प्रशासनाने मृत्यूचे ऑडिट करून कारणे शोधून ते रोखण्याची गरज आहे.
वाढता मृत्यूदर चिंतेचा विषय
जिल्ह्यात कोरोनामुक्तीचा टक्का वाढत आहे. तसेच नवे रूग्णही कमी आढळत आहे. असे असले तरी आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू कोरोनाने झाला असून याचा दर ३ टक्केपेक्षा जास्त आहे.
अद्याप धोका टळलेला नाही
नवे रूग्ण कमी होत असून रिकव्हरी रेटही ९५ टक्केपेक्षा जास्त आहे. असे असले तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. अद्याप धोका टळलेला नाही. - डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
तालुका ॲक्टिव्ह
बीड १२१
पाटोदा १०
वडवणी९
शिरूर का. ५
आष्टी ६७
गेवराई १४
अंबाजोगाई ४२
केज २१
माजलगाव ११
धारूर३
परळी १५