लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गस्त घालत असताना एखाद्या ठिकाणी वाहन उभा करून आपण कर्तव्यावर असल्याचा बनाव करणा-या व कार्यालयीन कामांत कामचुकारपणा करणाºया पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी पाऊले उचलली आहेत. जिल्ह्यातील सर्व पोलीस वाहनांना जीपीएस (ग्लोबल पोझिशनींग सिस्टीम) व कार्यालयात बायोमेट्रीक मशीन कार्यान्वीत करण्यात आली आहे.
मागील काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात चोºया, दरोडे, लुटमार यासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. पोलीस अधीक्षकांनी याबाबत जिल्ह्यात गस्त घालण्याच्या सुचना दिल्या. परंतु गुन्हेगारी काही केल्या कमी होत नव्हती. याची माहिती घेतली असता काही पोलीस अधिकारी, कर्मचारी गस्तीच्या नावाखाली घरी जात होते, किंवा इतरत्रच फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यांचा हा कामचुकारपणाच गुन्हेगारी वाढण्यास कारणीभूत असल्याचे समजले. हाच धागा पकडून जिल्ह्यातील २८ पोलीस ठाण्यांची सर्व वाहने, सहा उपविभागीय पोलीस अधिकारी यांची वाहने, १२ इतर पेट्रोलिंग करणारी वाहने यांना ‘जीपीएस’ बसविले. त्यामुळे कोणते वाहन कोठे आहे? याची माहिती मिळत आहे. ही सिस्टम कार्यान्वित केल्यामुळे गस्तीवरील अधिकारी, कर्मचारी काळजीने गस्त घालू लागले. याचा परिणाम गुन्हेगारी कमी होण्यासाठी झाला.
या सर्व सिस्टमवर पोलीस नियंत्रण कक्षातून ‘वॉच’ ठेवला जात आहे. तसेच पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे यांचेही या कामचुकारांवर बारीक लक्ष असल्याचे सांगण्यात आले. या सर्व प्रकारांमुळे मात्र कामचुकार अधिकारी, कर्मचाºयांची चलबिचल झाली आहे. विशेष म्हणजे रात्री साडे आकरा ते सकाळी पाच या वेळेत सर्व वाहने गस्तीवर असायलाच पाहिजेत, अशी तंबीही अधीक्षक जी.श्रीधर यांनी सर्वांना दिल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.