लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन केलेले आहे. परंतु, तरीही काही लोक विनाकारण बाहेर फिरत आहेत. ‘दंड भरू; पण बाहेर फिरू’, अशी भूमिकाच काही लोकांनी घेतली आहे. अशा भटकणाऱ्यांना पकडून आरोग्य विभागाने ॲंटिजन चाचणी केली. आतापर्यंत बीड शहरात आठ ठिकाणी सहा हजार ५७० लोकांची चाचणी केली असता ५३६ जण पॉझिटिव्ह आढळले. याचा टक्का तब्बल ८.१५ एवढा आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. असे असले तरी प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. या उपाययोजनांकडे काही लोक दुर्लक्ष करत आहेत. अशा लोकांनाच पकडून कोरोना चाचणी करण्याची मोहीम ३ मे रोजी सुरू केली. आतापर्यंत जिल्ह्यातील सहा हजार ५७० लोकांची चाचणी केली असता तब्बल ५३६ लोक पॉझिटिव्ह आढळले. याचा टक्का ८.१५ एवढा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक विनाकारण फिरत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दरम्यान, बीड शहरातील आठ विविध पथकांमध्ये डीएचओ डॉ.आर.बी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एच.डी. वाघमारे, बी.एस. सांगळे, बी.एस. जोशी, बी.सी.चव्हाण, महंमद जुनैद रऊफ, एस.एम.जाधव, व्ही.यू. कदम, एन.आर.पत्की कर्मचारी लोकांची कोरोना चाचणी करतात.
कारणे तीच, कोणाचा दवाखाना तर कोणाचा भाजीपाला जे लोक ग्रामीण भागातून बीड शहरात येत आहेत, त्यांची वेगळी कारण नाहीत. कोणी भाजीपाला घेऊन येत आहे तर कोणी दवाखान्यासाठी येत असल्याचे समोर आले आहे. त्यांचीही चाचणी केली जात आहे. जे लोक विरोध करतात, त्यांना पोलिसांच्या मदतीने आणून चाचणी केली जात आहे.
शहरात आठ ठिकाणी तपासणी
बीड शहरात आठ ठिकाणी आरोग्य विभागाने पथके तैनात करून चाचणी केली आहे. यात चऱ्हाटा फाटा, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सावता माळी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, बार्शी नाका, बशीरगंज चौक, महालक्ष्मी चौक यांचा समावेश आहे.