बीड : प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत खरीप हंगाम २०१८ या वर्षीचा सोयाबीन पिकाचा विमा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदार शेतकऱ्याला देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत. याप्रकरणात ॲड. बालाप्रसाद सारडा यांनी तक्रारदार लीलाबाई जुगलकिशोर रांदड यांची पुराव्यानिशी बाजू सक्षमपणे मांडली.
सोयाबीनची विमा नुकसान भरपाई मिळावी म्हणून लीलाबाई रांदड यांनी वेळोवेळी विमा कंपनीकडे व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाआधारे मागणी केेली होती. परंतु त्यांना विमा हप्ता देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी ॲड. बालाप्रसाद सारडा यांच्यामार्फत बीड येथील ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली. तेथे ॲड. सारडा यांनी आयोगापुढे सक्षम पुराव्यासह युक्तिवाद केला.
याप्रकरणी ग्राहक आयोगाने तक्रारदाराचा विमा हप्ता देण्याचे संबंधित विमा कंपनीला आदेशित केले. तसेच तक्रारदाराला मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम दोन हजार रूपये व तक्रारीचा खर्च म्हणून एक हजार रुपये निकाल मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत देण्याचे आदेशित केले. या प्रसंगी ॲड. बालाप्रसाद सारडा यांना ॲड. प्रबोध आपेगावकर, ॲड. विजयकुमार शिंदे, ॲड. गिरीश कुलथे यांनी सहकार्य केले.
खरीप हंगाम २०१८ या वर्षासाठी तक्रारदार लीलाबाई रांदड यांनी प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंतर्गत कापूस, मूग व सोयाबीन या पिकासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढला होता. त्या वर्षामध्ये पिकांचे नुकसान झाल्यामुळे त्यांना विमा कंपनीकडून कापूस व मुगाचा विमा हप्ता देण्यात आला. परंतु त्यांना सोयाबीनची विमा नुकसान भरपाई कंपनीने दिली नाही. त्यामुळे तक्रारदार शेतकऱ्याला ग्राहक आयोगात धाव घ्यावी लागली.