शिरूर कासार : तालुक्यात एकाएकी लोणी शिवारात दोन दिवसांत तेरा मोरांचा तडफडून मृत्यू झाला होता. पैकी पाच मोरांचा मृत्यू २२ जानेवारी रोजी झाला होता. या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी वन विभाग व पशुसंवर्धन विभागाने पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. या मोरांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे लोणी गावचा दहा किलोमीटर परीघ डेंजर झोनमध्ये आला आहे.
शुक्रवारी २२ व शनिवारी २३ रोजी लोणी गावच्या माळसोंड नामक शेतात तेरा मोरांसह होला, चित्तर आदी पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी प्राप्त अहवालानुसार बर्ड फ्लूचे कारण स्पष्ट झाले. आता सावधगिरी म्हणून व संसर्ग अन्य कुक्कुट पक्ष्यांत झाला काय? यासाठी दहा किलोमीटरपर्यंतच्या कुक्कुट पक्ष्यांचे नमुने तपासले जातील, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप आघाव यांनी सांगितले.
वनपरिक्षेत्र अधिकारी सायमा पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक बद्रीनाथ परझणे तसेच वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे यांची मदत घेत अन्य कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.