शिरूर कासार : सद्य परिस्थितीत पीक कर्जासाठी बँकेत होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी शेतकऱ्यांचे पीक कर्जाच्या अर्जांचे संकलन गावपातळीवर करण्याचे आदेशित केले आहे. त्याअनुषंगाने तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सचिव यांच्याकडे विहीत नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्रांची संचिका संकलन करून त्या बँकेत जमा केल्या जाणार आहेत.
भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज देण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. मात्र, जुनी कर्ज प्रकरणे नवीन करणाऱ्या शेतकऱ्यांना थेट बँकेत जाऊनच पूर्तता करावी लागणार आहे. शिवाय जिल्हा सहकारी बँकेचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सेवा सहकारी सोसायटीच्या सचिवांकडे या संचिका जमा कराव्यात. नवीन कर्ज घेणाऱ्यांनी बँकेत न जाता संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सचिवांकडे परिपूर्ण संचिका देण्याचे आवाहन तहसीलदार श्रीराम बेंडे यांनी केले आहे.