बीड शहरातील व्यावसायिक व नागरिकांच्या मागणीची दखल घेत आ. विनायक मेटे यांनी शिवसंग्राम बीड शहर कार्यकारिणीला आदेश दिले. त्यानुसार शहराध्यक्ष लक्ष्मण ढवळे, जिल्हा सरचिटणीस अनिल घुमरे, सुहास पाटील, शहर उपाध्यक्ष शेषेराव तांबे, युवक शहराध्यक्ष प्रशांत डोरले, युवक शहर उपाध्यक्ष अनिकेत देशपांडे, सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, अर्जुन यादव व इतर कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांना निवेदन दिले. थकीत करावरील दंड व्याज व लॉकडाऊन कालावधीतील सर्व व्याज माफ करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
तसेच बीड शहरातील अनेक गंभीर समस्यांबाबत मुख्याधिकाऱ्यांना कल्पना देत त्या सोडविण्याबाबत आग्रह धरला. शहरातील अनेक प्रभागामध्ये घाणीचे साम्राज्य परसलेले आहे. अनेक ठिकाणी कचराकुंडी नाही, गटारी तुंबलेल्या आहेत, पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही याकडेही त्यांचे लक्ष वेधले. येत्या पावसाळ्यात या सर्व समस्या दूर करण्याबाबत शिवसंग्रामच्या वतीने विनंती करण्यात आली. नागरिकांच्या मूलभूत सोईसुविधा नगरपालिका प्रशासनाने पूर्ण कराव्यात, अन्यथा शिवसंग्रामच्या वतीने येत्या काळात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसंग्राम बीड शहर कार्यकारिणीने निवेदनाद्वारे दिला आहे.