माजलगाव : शहरातील तीन कृषी सेवा केंद्रावर अनियमितता आढळुन आल्याने त्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. तर इतर तीन केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्राची तपासणी खत निरीक्षक तथा कृषी अधिकारी पंचायत समिती यांनी केली. यावेळी केंद्रात रासायनीक खताचा साठा फलक ग्राहकास स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी न लावणे, विक्री बिलामध्ये आवश्यक सर्व मजकुर तसेच विक्रेता व खरेदीदाराची स्वाक्षरी नसणे, साठा पुस्तक प्रमाणीत नसणे , साठा पुस्तक जुळत नसणे , नोंदणी प्रमाणपत्रामध्ये दुकानात विक्रीस ठेवण्यात आलेल्या उत्पादकाच्या स्त्रोतांचा समावेश नसणे या त्रुटी आढळुन आल्या.
यामुळे सदरील कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना शिफारस करण्यात आली होती. यांमध्ये सुनावणी घेऊन सुमित अॅग्रो एजन्सी, मोरेश्वर बीज भांडार व सदगुरु कृषी सेवा केंद्र यांचे परवाने दिनांक १५ जून २०२० पासून कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. तसेच दिपक बिज भांडार , ज्ञानेश्वर बीज भांडार व नमन कृषी सेवा केंद्र ( सर्व माजलगाव ) यांचे परवाने दि. १५ जून २०२० पासून पुढील आदेशापर्यंत कृषी अधिकारी बीड यांनी निलबिंत केले आहेत.
सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके कायदा- अधिनियमानुसार सर्व अभिलेख अद्यावत व परिपूर्ण ठेवावेत. तसेच किंमतीपेक्षा जास्त दराने रासायनिक खतांची विक्री केल्याचे आढळुन आल्यास कारवाई करण्यात येईल अशी माहिती तालुका कृषि अधिकारी शिवप्रसाद संगेकर यांनी दिली आहे.