रस्त्यावर जनावरांचा मुक्त संचार
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर जनावरांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यात अनलॉक झाल्याने शहरातील गर्दीत वाढ झाली असून, जनावरांमुळे अपघात घडत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर कुत्रे, गाई यांसह अन्य जनावरे ठाण मांडून बसत आहेत. मोकाट कुत्र्यांनी अनेकांना चावा घेऊन जखमी केल्याचे प्रकार घडले आहेत.
'लक्षणे असल्यास चाचणी करा!"
अंबाजोगाई : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी सर्दी, ताप व खोकला आदी लक्षणे दिसताच कोरोना चाचणी करावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बालासाहेब लोमटे यांनी गुरुवारी केले. विशेषत: ग्रामीण भागातील नागरिकांनी यापुढेही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात
अंबाजोगाई : यंदा तालुक्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्रफळावर खरिपाची पेरणी करण्यात येणार आहे. त्यातच यंदा मान्सून वेळेवर धडकणार असल्याने, तालुक्यात मान्सूनपूर्व खरिपाच्या पेरणीसाठी शेतीच्या मशागतीला वेग आला असून, जवळपास शेतीच्या मशागतीचे काम हे अंतिम टप्प्यात आले आहेत. कोठे कोठे शेतीचे काम पूर्णत्वास गेले असून, आता केवळ मान्सूनच्या आगमनाची वाट शेतकरी पाहत आहेत. खरिपाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पीककर्जाची चिंता सतावत असल्याचे चित्र आहे.
मोफत लसीकरणाबद्दल सरकारचे आभार
अंबाजोगाई : देशातील १८ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. एक रकमी धनादेश देऊन लस खरेदीची तयारी दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने वाचलेल्या सात हजार कोटींतून आता गरिबांना तातडीने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भाजपाचे कार्यकर्ते ॲड. संतोष लोमटे यांनी केली आहे.