लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर कासार : तालुक्यातील बारगजवाडी येथील एका सुशिक्षित शेतकऱ्याने मार्च, २०२० मध्ये एक एकरावर सुधारित जातीच्या पेरू रोपांची लागवड केली. पेरूची जोपासना योग्यरीत्या झाल्याने वर्षाच्या कालावधीतच झाडाला पेरू बहरला. दर्जेदार पेरू असल्याने, त्यास दिल्लीच्या बाजारपेठेत चांगला भाव मिळाला आहे.
तालुक्यात सध्या शेतीबाबत नवनवे प्रयोग राबवून ते यशस्वी केले जात आहेत. कोरोनामुळे शिकले-सवरलेही शेतीत रमू लागले आहेत. कांदा, बटाटा, कोबी, मिरची, वांगी, शेवगा, रताळे, टरबूज, खरबूज व उन्हाळी हंगामात बाजरी, भगर, भुईमूग, मूग, तीळ असे खरीप वाण घेऊन उत्पन्न घेतले जात आहेत. फळबागेकडेही आकर्षण वाढले आहे. त्यात अनेक जण यशस्वी होत असल्याचे चित्र आहे.
बारगजवाडी येथील शेतकरी चंद्रभान कोंडीबा बारगजे तसे पारंपरिक शेतकरी. शेती करून त्यांंनी आपल्या मुलाला अभियंतापर्यंत शिक्षण दिले. मुलगा रामदास बारगजे यांनी आपल्या एक एकर क्षेत्रावर गेल्या मार्चमध्ये ५०० पेरूंच्या रोपांची लागवड केली होती. याच महिन्यात कोरोनाला सुरुवात झाली होती. यामुळे सारे अर्थचक्र थांबले होते. माणसे घरात डांबून ठेवली गेली. यालाच संधी समजून शेतात वेळ खर्ची घालत पेरूची बाग तयार केली. ठिबकसाठी २५ हजार तर रोपांसाठी ३० हजार व अन्य खर्च १५ हजार रुपये असा ७० हजारांचा खर्च केला. मात्र, पेरूने पहिल्याच वर्षी चांगली कमाई केली. एका पेरूचे वजन तब्बल ७०० ते ९०० ग्रॅम इतके भरत आहे. त्याची चव गोड व रूचकर असल्याने थेट दिल्लीकरांच्याही पसंतीस उतरले आहे. दिल्लीत या पेरूला ४५ ते ५० रुपये प्रती किलो असा भाव मिळाला. पहिल्याच वर्षी पेरूने एका एकरात सव्वा लाखांचा टप्पा पार केला आहे. पुढील वर्षी तो दुपटीने नक्कीच वाढेल, असा विश्वास रामदास बारगजे यांनी व्यक्त केला.
बारगजवाडी बारगजे यांच्या पेरू बागेला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी अनंत भंडारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांच्यासह नगरपंचायतीचे मुख्याधिकारी किशोर सानप, पंचायत समिती विभागाचे उपकार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, प्रकल्प संचालक दादासाहेब वानखेडे, महेंद्र आणेराव, गटविकास अधिकारी चव्हाण यांनी भेट देऊन पेरूची चव चाखली आहे.
....
परदेशात पेरू पाठविणार
आपण पेरूची बाग लावली. पेरूने पहिल्याच वर्षी दिल्ली गाठली. शिरूर तालुक्यातील आमचा पेरू पुढील वर्षी परदेशात पाठविण्याचा मानस आहे. शिक्षीत तरुणांनीही आपल्या शेतीत नवनवीन प्रयोग करावेत. ‘समृद्ध शेती, समृद्ध देश’ अशी ओळख आपल्या देशाची करावी, असे आवाहन रामदास बारगजे यांनी केले आहे.
...