बीड : कोरेगाव भीमा येथील घटनेनंतर राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेचा निषेध करत बहुजन विकास मोर्चाचे बाबुराव पोटभरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. आज सकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
पत्रकार परिषदेत राजीनाम्याबद्दल माहिती देताना पोटभरे यांनी सांगितले कि, राज्य सरकार आंबेडकरद्रोही, जातीयवादी आणि मराठा, दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिमविरोधी असल्यामुळे हा राजीनामा देत असल्याचे पालकमंत्र्यांना दिलेल्या राजीनामापत्रात स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणीत राज्यात सत्तेवर आलेल्या भाजपच्या सरकारने दिलेले कुठलेही पद स्विकारणे म्हणजे आरएसएसच्या संविधान बदलण्याच्या भूमिकेला साथ देण्यासारखे आहे. भाजपा, आरएसएसच्या जातीयवादी मानसिकतेच्या निषेधार्थ हा राजीनामा आहे असे ही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, या राजीनामाप्रकरणी कुठलीही तडजोड करणार नाही. पालकमंत्री सामाजिक समतेसाठी काम करत नाहीत, आजपासून त्यांच्यासोबतचे नाते तुटले असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांच्या निषेधार्थ हा राजीनामा आहे. भाजप, संघाला मदत करणा-यांना पुढची पिढी माफ करणार नाही. यापुढे आपली राजकीय भूमिका भाजपविरोधात असेल असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.