लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : गेल्या चार महिन्यात पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीने उच्चांक गाठला आहे. या चार महिन्यात पेट्रोल, डिझेलच्या किमती जवळपास दहा रुपयांनी वाढल्या आहेत तर घरगुती गॅसच्या किमती जवळपास १२५ रुपयांनी वाढल्या आहेत. इंधन दरवाढीमुळे आपोआपच महागाई देखील वाढत आहे.
नोव्हेंबर २० मध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर जवळपास ८८.७८ रुपये प्रति लिटर होती. ती चार महिन्यात वाढत जाऊन फेब्रुवारी महिन्यात ९४.५२ रुपयांवर गेली आहे. म्हणजे जवळपास साडेसहा रुपयांनी पेट्रोल वाढले आहे.
नोव्हेंबरमध्ये डिझेलचा दर जवळपास ७६.७२ रुपये प्रति लिटर होता. तो देखील चार महिन्यात सात रुपये प्रति लिटर वाढला आहे. पेट्रोल, डिझेलचे दर सरासरी सात -आठ रुपयांनी वाढले तरी वाहतूकदारांनी त्यांचे दर मात्र पटीत वाढवल्यामुळे पर्यायाने इतर वस्तूंचे, भाजीपाल्याचे दरही वाढले आहेत.
घरगुती गॅस सिलिंडरची किंमत चार महिन्यात जवळपास सव्वाशे रुपयांनी प्रति सिलिंडर वाढली असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहक या दरवाढीला वैतागला आहे. स्वयंपाकघराचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. नोव्हेंबरमध्ये जवळपास ६२० रुपये असलेली सिलिंडरची किंमत ७४५ रुपयांवर गेली आहे. शासनाने यात लक्ष घालून इंधन दरवाढीला लगाम घालावा, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.
व्यवसाय बंद होईल
माझी पेट्रोलची टॅक्सी आहे. पेट्रोलचे दर शंभरी गाठत आहेत. असेच दर वाढत गेले तर मला माझा टॅक्सी व्यवसाय पुढे चालू ठेवणे कठीण जाणार आहे.
- सुभाष पाटील
शिवाजीनगर, बीड
भाडे मात्र वाढत नाही
डिझेलच्या किमती सातत्याने वाढत असल्याने टॅक्सी व्यवसाय करणे अवघड झाले आहे. ग्राहक भाडे वाढवून देत नाहीत. किंमत वाढली तरी ग्राहक पैसे देत नाहीत.
- अनिल गायकवाड
बालेपीर, बीड
दर कमी केले पाहिजेत
दर महिन्याला गॅसची किंमत वाढत आहे. कोरोनामुळे आधीच पगारात कपात झाली आहे. संसार करणे कठीण झाले आहे. सर्वसामान्य जनतेला हे दर परवडत नाहीत.
- सुरेखा कुलकर्णी
सहयोगनगर, बीड