बीड : शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या सहयोग नगर भागात स्वच्छता, पाणी, वीज या समस्या वाढल्या आहेत. याच्या तक्रारी वारंवार पालिकेकडे करण्यात आल्या, परंतु पालिकेने याकडे दुर्लक्ष केले. आता येथील रहिवासी आक्रमक झाले असून, त्यांनी पत्रक काढून पालिकेबद्दल संताप व्यक्त केला आहे. बीड शहरातील वाढत्या समस्यांबद्दल नागरिकांचा पालिकेबद्दल रोष वाढत आहे. शहरात सर्वत्रच घाणीचे साम्राज्य पसरले असून, स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. तसेच अतिवृष्टी झाल्याने शहराला पाणी पुरवठा करणारी धरणेही ओव्हरफ्लो झाली आहेत. असे असतानाही बीड शहराला १० ते १२ दिवसाला पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याबाबत पालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही काहीच फरक पडत नसल्याने सहयोग नगर भागातील नागरिकांनी चक्क पत्रक काढून पालिकेबद्दल संताप व्यक्त केला आहे. या पत्रकावर स्वप्निल बजगुडे, संजय करवा, गणेश तपसे, बलभीम बजगुडे, गणेश जगताप, सुधीर जगताप, शेख जुनेद, हुसेन पठाण, अल्लाउद्दीन पठाण, किशोर नाईकवाडे, अहमद, शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सहयोग नगरात समस्यांचा ""ढिगारा""; पालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:37 AM