ऑनलाईन लोकमत
नांदेड, दि. 18 : अर्धापूर तालुक्यातील दाभड शिवारातील सत्यगणपती मंदिरात गुरुवारी मध्यरात्री २ च्या दरम्यान ६ ते ७ चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला. चोरांनी दानपेटी फोडताच पुजार्याने प्रसंगावधान दाखवत मंदिरात चोर आल्याची खबर पोलिसांना दिली. यांनतर पोलीस तात्काळ मंदिरात आल्याने चोरांनी तेथून पलायन केले.
या बाबत अधिक माहिती अशी कि, सत्यनारायण मंदिरात गुरुवारी मध्यरात्री ६ ते ७ चोरांनी मंदिराचे लोखंडी गेट तोडून प्रवेश केला. यावेळी रात्रीच्या कामावर असलेल्या कर्मचार्यास त्यांनी तलवारीचा धाक दाखवत दानपेटी फोडली. याचवेळी मागच्या खोलीत असलेल्या पुजार्याला याची चाहूल लागली. त्यांनी लागलीच याची माहिती पोलिसांना फोनवर दिली. रात्रीच्या गस्तीवर असलेले पोहेकॉ. गौतम वाव्हुळे व चालक माधव गीते यांनी तात्काळ मंदिराकडे धाव घेतली. पोलिसांच्या गाडी चोरांना मंदिराच्या आवारात आल्याचा आवाज आल्याने दानपेटी तशीच सोडून चोरांनी तेथून पळ काढला. ओळख पटू नये म्हणून चोरांनी जाताना सीसीटीव्ही कॅमेरे फोडून डीव्हीआर घेऊन गेले आहेत.
घटनेची माहिती समजताच मंदिर प्रशासक तथा तहसीलदार डॉ. अरविंद नरसिक, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक विजय डोंगरे यांनी मंदिरात जाऊन पाहणी केली. मोठया प्रमाणावर देणगी जमा होणाऱ्या या मंदिराची सुरक्षा केवळ एक किंवा दोन जणावर असल्या बद्दल नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.