माजलगाव : ग्रामसभेच्या ठरावात खाडाखोड करुन बोगसयादी पंचायत समितीला सादर करुन पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी मौजे देवखेडा येथील सरंपच शेख शाहीन सिराज यांच्यावर कारवाई करत अप्पर आयुक्तांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले. तसेच ग्रामसेविका एन.यु.तोटावार यांना गटविकास अधिकारी चव्हाण यांनी वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका आयुक्तांनी निकालात ठेवला आहे.
मौजे देवखेडा येथील माजी सरपंच शेख मोहसीन युनूस यांनी अप्पर विभागीय आयुक्त यांच्याकडे सरपंच श्रीमती शेख शाहिन सिराज व ग्रामसेवीका एन.यु तोटावार यांच्या विरोधात अपील केली होती. ग्रामपंचायत आधिनियम 1958 चे कलम 39 अन्वये दाखल अपिला नुसार, सरपंच श्रीमती शेख शाहिन व ग्रामसेवीका तोटावार यांनी दि 30 एप्रिल 2018 रोजीच्या ग्रामसभेमधिल ठराव क्रं 10 नुसार प्रपत्र ड मध्ये 24 लाभार्थ्यांची नावे समाविष्ट होती. मात्र सदरील नावा व्यतिरिक्त सरपंच व ग्रामसेवक यांनी 137 लाभार्थ्यांची अनधिकृत प्रपत्र ड ची यादी माजलगाव पंचायत समितीला सादर केली.
या अपिलावर दि. २ जाने रोजी सुनावणी घेण्यात आली. आयुक्तांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सरपंच शेख शाहिन सिराज यांना ग्रामपंचायत आधिनियम 1958 चे कलम 39 (1) नुसार सरपंच पदाची कर्तव्य पार पाडतांना गैरवर्तुवणूक केल्याबाबत दोषी ठरवून अपात्र केल्याचा निकाल दिला.