तलाठी कार्यालय परिसरात दुर्गंधी
माजलगाव : तालुक्यातील अनेक तलाठी कार्यालयाच्या इमारतीत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. काही ठिकाणच्या इमारती धूळ खात असून महसूल यंत्रणेचे दुर्लक्ष आहे. सज्जावर तलाठ्यांना थांबण्याची सक्ती करण्याची मागणी होत आहे.
विजेचा लपंडाव
अंबाजोगाई : शहर व परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. अचानक खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने व्यावसायिकांवर परिणाम होऊ लागला आहे. बाजारपेठेला याचा फटका बसत आहे.
इंटरनेट सेवा विस्कळीत
बीड : काही दिवसांपासून बीड शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेटला स्पीड मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. संबंधित विभागाकडे अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या; परंतु याची दखल घेतली जात नसल्याचे दिसते.
बस सुरू करा
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील बससेवा अजूनही पूर्ववत सुरू झाली नाही. बससेवा सुरू न झाल्याने प्रवाशांना अॅपे, रिक्षा या अवैध वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण बससेवा सुरू करण्याची मागणी आहे.
बँकेत दलालांमार्फत सर्वसामान्यांची लूट
अंबाजोगाई : तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. सामान्य ग्राहक बँकेतील अधिकाऱ्यांकडे गेल्यास त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. मात्र, तीच व्यक्ती दलालांच्या माध्यमातून गेल्यास काम तत्काळ होते.
पाणंद रस्त्याची दुरुस्ती करावी
अंबाजोगाई : तालुक्यातील मुडेगाव येथे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणंद रस्ते वाहून गेले आहेत. वाहून गेलेले हे रस्ते शासनाने दुरुस्त करून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी. सध्या शेतात येण्या-जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतात ट्रॅक्टर, दुचाकी वाहने व इतर वाहने जात नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत.
गेवराई परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले
गेवराई : शहरातील हद्दवाढ झालेल्या भागात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी शहरातील गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. पोलीस ठाण्याचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.