कडा : गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर खड्डा की खड्ड्यांत रस्ता हेच कळत नसल्याने व वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना बोलूनदेखील उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने राष्ट्रीय महामार्गावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सोमवारी कडा शहरवासीयांनी रास्ता रोको आंदोलन करीत दुरुस्तीची मागणी केली.
आष्टी तालुक्यातून गेलेल्या बीड-नगर रस्त्याचे काही ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. पण उर्वरित आष्टी-कडा -साबलखेड रस्ता कामाला मंजुरी नसल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. हे खड्डे संबंधित अधिकाऱ्यांकडून बुजविले जावेत यासाठी अनेकदा मागणी करूनही कानाडोळा करून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे सोमवारी कडा येथील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी अनिल ढोबळे, रमजान तांबोळी, संजय ढोबळे, संपत सांगळे, संदीप खाकाळ, बाळासाहेब कर्डीले, संपत कर्डिले, अनिल शिंदे, सुनिल आष्टेकर, अन्सार सय्यद, ठकाराम दुधावडे, भाऊसाहेब भोजने, परमेश्वर कर्डिले आदी उपस्थित होते. दरम्यान,आंदोलनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ खड्डे बुजवण्यास सुरुवात केली जाईल, असे लेखी आश्वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, तलाठी औदकर, पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.