गेवराई : शहरातून जाणाऱ्या बीड रोड बायपास ते जालना रोड व बायपासपर्यंतच्या ६ किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी लहान-मोठे खड्डे पडल्याने याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शेख एजाज यांनी केली आहे.
गेवराई, बीड या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या काही वर्षात पूर्ण झाल्याने आता हा रस्ता चांगला झाला. तसेच गेवराई शहराबाहेरून वळण रस्ता झाल्याने वाहनधारकांना सुकर झाले. मात्र पूर्वीचा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून झालेले नाही. बीड रोड बायपास ते जालना रोड बायपास या शहरातून जाणाऱ्या ६ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे तीन तेरा वाजले आहेत. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने व आता पावसाळा सुरू झाल्याने खड्ड्यात पाणी साचून झालेले खड्डे वाहनधारकांना रात्रीच्या वेळेला दिसत नसल्याने अपघाताला निमंत्रण दिल्यासारखे झाले आहे. हे पडलेले खड्डे एवढे वाढले आहेत की रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. तर पाऊस पडल्यावर वाहनधारकांची वाहने अनेक वेळा घसरून पडल्याने अपघात झाले आहेत. तरी रस्त्यावर पडलेले खड्डे प्रशासनाने त्वरित बुजवावे, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शेख एजाज यांनी केली आहे.
===Photopath===
100621\20210610_142522_14.jpg