- नितीन कांबळेकडा- मराठा आरक्षण देण्यात सरकार चालढकल करत असल्याचा आरोप चोभानिमगाव येथे आंदोलन सुरु आहेत. आज सरकारचा निषेध म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नावांचे प्रतीकात्मक फलक रेड्यावर लावत चोभानिमगाव येथे धिंड काढण्यात आली. तसेच आरक्षण मिळेपर्यंत गावातील शाळा बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
जालना येथील मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून आष्टी तालुक्यातील चोभानिमगांव येथे तीन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू आहे. सरकारचा दशक्रिया विधी, मुंडण, त्यानंतर आज शनिवारी सकाळी रेड्याच्या गळ्यात मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री नावाचे फलक गुंतवून गावभर धिंड काढत सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तो पर्यंत गावातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक ठिकाणी चक्काजाम, बेमुदत उपोषण केली जात आहेत. तरी देखील सरकार ठोस निर्णय घेत नसल्याचा निषेध ग्रामस्थांनी यावेळी केला.