बीड : अंबाजोगाई शहरातील मंडीबाजार परिसरातील सर्व्हे नं.३५८ व ३५९ मधील आरक्षण स्थानांतरणबाबत नगराध्यक्ष रचना मोदी, नगरसेवक राजकिशोर मोदी, मुख्याधिकारी, नगररचनाकार यांनी बेकायदेशीर बनावट ठराव करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. तो ठराव जिल्हाधिकारी यांनी रद्द ठरविल्याने खळबळ उडाली आहे.
येथील नगरसेवक शेख रहीम शेख रज्जाक यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, सर्व्हे नं.३५८ व ३५९ या जमिनीवर आरक्षण होते. ते आरक्षण उठविण्यात यावे, यासाठी नगराध्यक्षा रचना मोदी, नगरसेवक राजकिशोर मोदी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, नगररचनाकार यांनी संगनमत करून आरक्षण स्थानांतरणाबाबत बेकायदेशीर बनावट ठराव केला होता. तो ठराव बनावट आहे. ज्या दिवशी राजकिशोर मोदी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेस उपस्थित नव्हते, त्या दिवशीचा ठराव असून मोदीच या ठरावाचे सुचक आहेत. ते सभागृहात नसल्याचे पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे तो ठराव जिल्हाधिकारी यांनी रद्द केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात सदरील जमिनीवर मोकळी जागा ठेवली नाही. जयवंती नदीचा उल्लेख नाला असा केला आहे. मोजमापात हरितपट्टा दाखविणे अपेक्षित असताना तो दाखविला नाही. नदीचे क्षेत्र वेगळे दर्शविले नाही. याबाबींचा उल्लेख करून मुख्याधिकाऱ्यांनी सर्व रेखांकने तात्काळ रद्द करण्यात यावेत, असे आदेशात स्पष्ट केले आहे.