बीड : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती गंभीर बनत असल्याने आरोग्य विभागाने 'मिशन झीरो डेथ' ही मोहीम राबविली जात आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करा, तसेच कोरोना चाचण्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवून जास्तीत जास्त रुग्ण शोधा, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी आष्टीचे वैद्यकीय अधीक्षक व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांनी सोमवारी तालुक्याचा आढावा घेतला.
जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच वाढता मृत्युदर रोखण्यासाठी मोहीम राबविली जात आहे. यासाठी जिल्ह्यात सर्वेक्षण आणि तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांच्या तक्रारी वाढत आहेत. याच अनुषंगाने सोमवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी आष्टीला धाव घेतली. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला भेट देत रुग्णांशी संवाद साधला. आतील अस्वच्छता आणि सुविधांबद्दल सूचना केल्या. नव्याने भरती झालेल्या डॉक्टरांमध्ये अनुभव कमी असल्याचे दिसले. त्यांना मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाच्या सूचनाही डॉ. पवार यांनी दिल्या. त्यानंतर त्यांनी तालुक्याचा आढावा घेतला. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कोरोना चाचणी, होम आयसोलेट रुग्णांची माहिती, कंटेन्मेंट झोन, आदींचा आढावा घेऊन सूचना केल्या. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहुल टेकाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन मोरे, गटविकास अधिकारी मुंडे, डॉ. अनिल आरबे, आदींची उपस्थिती होती.
===Photopath===
190421\19_2_bed_13_19042021_14.jpeg
===Caption===
आष्टीच्या कोवीड सेंटरमध्ये जावून रूग्णांशी संवाद साधताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार. सोबत डॉ.नितीन मोरे, डॉ.अनिल आरबे आदी.