लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : देशातील बारा ज्योतिर्लंिगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या नगरीत दर्शनासाठी येणाऱ्या यात्रेकरुंची परळीच्या बसस्थानकात गैरसोय होत आहे. या बसस्थानकात शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय नाही. बसस्थानकात खड्डे व घाणीचे साम्राज्य यामुळे धुळीचा त्रास व दुर्गंधी यात्रेकरुंबरोबरच प्रवाशांना सहन करावा लागत आहे.काही दिवसांपासून इलेक्ट्रॉनिक तिकीट मशिन ६० नादुरुस्त असल्याने परळीच्या आगारातील बस वेळेवर धावत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना बसची प्रतीक्षा करीत बसावी लागते. अशा विविध समस्यांनी या बसस्थानकात डोके वर काढलेले असतानाही त्यावर कसल्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे प्रवाशात नाराजीचा सूर निघत आहे.परळी हे शहर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले श्री प्रभु वैद्यनाथाचे तीर्थक्षेत्र आहे. राज्यातील महत्त्वाचे ठिकाण म्हणून परळीची ओळख आहे. त्यामुळे परळीत येणा-या जाणाऱ्यांची वर्दळ मोठी आहे.सुरक्षेचा प्रवास म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसकडे पाहिले जाते. परंतु परळी बसआगारातून बसेस वेळेवर निघत नाहीत. निघालीतर जुन्या बसेस उभ्या केल्या जातात. त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होते.गेल्या काही दिवसांपासून ६० इलेक्ट्रॉनिक तिकीट मशीन बिघडल्या आहेत. त्यामुळे बसेस परळीच्या बस आगारातून उशिरा निघत आहेत. नादुरुस्त ईटीएममुळे बसवाहक (कंडक्टर) हैराण झाले आहेत. पर्यायी व्यवस्था म्हणून जुन्या ‘मॅन्युअल’ पद्धतीने तिकिटे वाहक प्रवाशांना देत असल्याचे दिसून येत आहे.
परळी स्थानकातील बसेसचे नियोजन कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:39 AM