सोमनाथ खताळ
बीड : राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आरोग्य विभाग प्रयत्न करीत आहेत. अर्थसंकल्पातील विशेष निधीतून ८९ कोटी रुपये खर्च करून ४६३ रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या आहेत. यात ग्रामीण भागात २६३, तर शहरांमध्ये १९० रुग्णवाहिका धावणार आहेत. यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाकाळात सामान्य रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. पहिल्या लाटेत कोरोनाबाबत भीती असल्याने रुग्णांना ने-आण करण्यासाठी खाजगी वाहन उपलब्ध होत नव्हते. तर सरकारी रुग्णवाहिका अपुऱ्या पडत होत्या. त्यामुळे रुग्ण वेळेवर रुग्णालयात जाण्यास अडचणी येत होत्या. तसेच कोरोनामुळे नॉन कोविड रुग्णांकडेही दुर्लक्ष झाले होते. उपलब्ध रुग्णवाहिकासुद्धा धोकादायक झाल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात होती. हाच धागा पकडून शासनाने आरोग्य विभागाच्या विशेष निधीतून ८९ कोटी ४८ लाख रुपये खर्च करत ४६३ रुग्णवाहिका खरेदी केल्या आहेत. याबाबत राज्याचे सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी आदेश काढले आहेत. ज्या आरोग्य केंद्र, उपकेंद्र, रुग्णालयांना रुग्णवाहिका दिल्या जाणार आहेत, त्याची यादीही जाहीर केली आहे. महिनाभरात या सर्व रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेत येणार असल्याचे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले.
--
कोणत्या जिल्ह्याला किती रुग्णवाहिका
राज्यात ४६३ रुग्णवाहिकांची यादी जाहीर केली आहे. यात अहमदनगर १४, अकोला २, अमरावती ४, भंडाडा ८, बीड ३१, बुलडाणा २१, चंद्रपूर २०, धुळे १, गडचिरोली १२, गोंदिया २५, हिंगोली ५, जळगाव ७, जालना ८, नंदूरबार ४, उस्मानाबाद १, पालघर १३, परभणी ११, पुणे १३, रायगड १२, रत्नागिरी ३१, सातारा २, सिंधुदुर्ग ११, सोलापूर ८, ठाणे ३, वर्धा ३, वाशिम ३ या अशा २७३ रुग्णवाहिका आरोग्य केंद्र व उपकेंद्रांसाठी वितरित केल्या आहेत. तसेच १९० रुग्णवाहिका या ट्रॉमा केअर सेंटर, ग्रामीण, उपजिल्हा, स्त्री व इतर रुग्णालयांना जिल्हानिहाय दिल्या आहेत.
---
राजकारण्यांचा श्रेय घेण्याचा होणार प्रयत्न
राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच रुग्णवाहिका आल्या आहेत. त्यामुळे ज्या त्या जिल्ह्यातील राजकीय नेते, पुढारी यांच्याकडून या रुग्णवाहिका आपल्या प्रयत्नामुळेच आल्या, अशा बाता ठोकून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो; परंतु या सर्व रुग्णवाहिका आरोग्य विभागाच्या निधीतून दिल्या आहेत. याच्याशी राजकारण्यांचा कसलाही संबंध नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.